रीलचा नाद जीवावर बेतला!धबधब्याजवळ व्हिडिओ काढताना पाय घसरला अन्…..१५० फुटांवरून खाली पडला

(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – आजकाल प्रत्येकालाच रील्स बनवून सोशल मीडियावर प्रसिद्ध व्हायचं असतं. त्यासाठी लोक वाटेल ते करतात. रील्स बनवताना किंवा सेल्फी काढताना अनेक भयंकर घटना घडल्या आहेत. राजस्थानच्या चित्तोडगडमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मुसळधार पावसात धबधब्याजवळ रील काढत असताना एक तरुण तब्बल दीडशे फुटावरून खाली पडला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली

दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. पहिल्या दिवशी या तरुणाचा शोध घेण्यासाठी तब्बल सात तास शोधमोहीम राबविण्यात आली, मात्र त्याचा पत्ता लागला नाही. अंधारामुळे बचावकार्य थांबवण्यात आलं. तरुणाचा शोध घेण्यासाठी पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. धबधब्यातील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या तरुणाच्या मित्रांनी सांगितलं की, भिलवाडाच्या भवानी नगर येथील रहिवासी असून त्याचं नाव कन्हैयालाल रेगर असं आहे.

 

पावसाळ्याचा आनंद लुटण्यासाठी तो आपल्या काही मित्रांसह मेनाल फॉल्स येथे आला होता. सेल्फी काढण्यासाठी आणि रील काढण्यासाठी तो धबधब्याच्या पाण्यात गेला. याच दरम्यान त्याचा पाय घसरला, त्यानंतर त्याने सुरक्षिततेसाठी लावलेली साखळी पकडली. मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात तो फार काळ टिकू शकला नाही. काही मिनिटांतच तो दीडशे फुटावरून खाली पडला.