
सासू सासऱ्याने धावत्या एसटीमध्ये जावयाचा नाडीने गळा आवळून खून केला. ही घटना गडहिंग्लज ते कोल्हापुर दरम्यान घडली. घटनेनंतर अवघ्या चार तासांत पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या. जावई दारू पिऊन मुलीला त्रास देत असल्याने त्याला संपवण्याचा निर्णय दोघांनी घेतला असल्याचे तपासात समोर आले आहे. संदिप पत्नी आणि मुलासह चिंचवाड येथे राहत होता. तो दारूच्या नशेत पत्नीबरोबर भांडण करून तिला मारहाण करत असे. याला वैतागून दोन वर्षांपूर्वी ती मुलाला घेऊन माहेरी रहायला गेली होती.

संदिप तिथे सुध्दा जाऊन तिला मारहाण करत होता. चार दिवसांपूर्वीच त्याने दारू पिऊन पत्नी आणि मुलाला मारहाण केली होती. त्यावेळी मुलीने आपल्या वडिलांना सांगितले होते की, संदिपचा बंदोबस्त करा, अन्यथा मी मुलाला घेऊन आत्महत्या करेन. २५ सप्टेंबरला रात्रीही संदिपने दारू प्याली होती. त्याच्या वागण्याला वैतागून सासू सासरे त्याला घेऊन विनावाहक एसटीत बसले. संदिप दारूच्या नशेतच मागच्या सीटवर बसला होता. सासऱ्याने संदिपच्या बॅगेतील एका पायजम्याची नाडी काढली आणि नाडीनेच त्याचा गळा आवळला. कागलजवळ घडलेल्या या घटनेत संदिपचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सासरा पुढच्या सीटवर येऊन बसला. रात्री दहाच्या सुमारास एसटी कोल्हापुर आगारात आल्यावर दोघांनी संदिपची बॅग एका दुकानाच्या दारात ठेवली. त्यानंतर त्याचा मृतदेह ही ठेवला.

त्यानंतर दोघे पुन्हा त्याच एसटीने गडहिंग्लजला गेले. दोघेही रात्री १. ३० वाजता पोहचले. गुरूवारी सकाळी एसटी स्टँडमधील सुरक्षा रक्षकाने संदिपचा मृतदेह पाहिला आणि तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी संदिपच्या खिशाची तपासणी केली असता त्यात एक डायरी, मोबाईल आणि गडहिंग्लज ते कोल्हापुर एसटीचे तिकिट मिळाले. डायरीत त्याचे नाव आणि पत्नीचा मोबाईल नंबर मिळाला. पोलिसांनी तिला फोन करून कोल्हापुरला बोलावून घेतले. पोलिसांनी कोल्हापुर आणि गडहिंग्लज एसटी स्थानकाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात काळे दांपत्य त्याच्या बरोबर आढळले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना पकडून चौकशी केली असता दोघांनीही खुनाची कबूली दिली. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली.









