(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – गेल्या १४ महिन्यांत १० महिलांची हत्या करणारा सायको किलर अखेर पोलिसांनी पकडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सीरियल किलर हा नवाबगंज पोलीस स्टेशन परिसरातील असल्याचं सांगण्यात येत आहे. उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात गेल्या १४ महिन्यांत त्याने अनेक महिलांची हत्या केली. अलीकडेच पोलिसांनी तीन संशयितांची रेखाचित्रे प्रसिद्ध केली होती. आरोपी त्यापैकीच एक असल्याचं सांगितलं जात आहे.
२०२३ मध्ये शाही शिशगढ आणि फतेहगंज पश्चिम पोलीस स्टेशन परिसरात ९ खून झाले होते. त्यावेळी पोलिसांना सीरियल किलरचा संशय आला. यानंतर पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी मोठा फौजफाटा तैनात केला. त्यानंतर हत्या थांबल्या होत्या. मात्र पुन्हा २ जुलै रोजी शेतात महिलेचा मृतदेह आढळून आला. या हत्येचा प्रकारही तसाच होता. त्यानंतर पुन्हा सुई सिरीयल किलरकडे वळली आणि लोकांची चौकशी करून तीन रेखाचित्रे तयार करण्यात आली.
मागील वर्षी शिशगड आणि शाही परिसरात नदीकाठच्या आसपास ९ महिलांची महिलांची हत्या झाली होती. ५ जून रोजी शाही गावातील कलावती यांचा खून झाला, १९ जून रोजी धनवती यांचा मृतदेह शाही रोडच्या बाजूला आढळला. ३० जून रोजी प्रेमवती यांचा मृतदेह आनंदपूर येथे आढळून आला. २२ जूनला कुसुमाचा मृतदेह खजुरिया गावात सापडला होता. २३ ऑगस्टला वीरवतीचा अर्धनग्न मृतदेह ज्वालापूर गावात सापडला होता. ३१ ऑक्टोबर रोजी लखीमपूरमध्ये एका ६० वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली होती. २० नोव्हेंबर रोजी खरसैनी गावात ६० वर्षीय दुलरोन देवी यांची हत्या करण्यात आली होती. २६ नोव्हेंबर रोजी जगदीशपूरमध्ये ५५ वर्षीय उर्मिलाची हत्या करण्यात आली होती. या सर्व महिलांची गळ्यात फास घालून हत्या करण्यात आली होती.