
रिक्षाचालकाच्या मानेला छऱ्याची बंदूक लावून माझ्या नादी लागू नको नाहीतर तुला बघून घेईल अशी धमकी दिली. तसचे डोक्यात जड वस्तूने मारहाण करुन गंभीर जखमी केले.

ही घटना येरवडा भागातील चंद्रमा नगर परिसरतील कॉमरझोन व पंचशील नगर येथे रविवारी घडली आहे. याबाबत वसीम गनी सैय्यद ,वय-४० यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभी नागेश स्वामी व गणराज नागेश स्वारी यांच्यावर आयपीसी ३०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रिक्षाचालक असून रविवारी कॉमरझोन येथे रिक्षा थांबवून चहा पिण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांच्या ओळखीचा आरोपी अभी स्वामी त्याठिकाणी आला. त्याने त्याच्याकडे असलेल्या छऱ्याची बंदूक काढून वसीम यांच्या मानेला लावली. माझ्या नादाला लागू नको नाहीतर तुला पाहून घेईल अशी धमकी दिली. याबाबत विचारणा करण्यासाठी वसीम सय्यद आरोपीच्या घरी गेले. त्यावेळी अभी याचा भाऊ गणराज याने टणक वस्तूने वसीम यांच्या डोक्यात मारुन जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.









