महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यपदाची या नेत्यावर जबाबदारी?

मुंबई – नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यातच काँग्रेसचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे काँग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेष करुन नाना पटोले यांच्या चुकीच्या भुमिकेमुळे पक्षाचा पराभव झाल्याचा सुर पक्षांतर्गत सुरु आहे. त्यामुळे नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात महाविकासआघाडीला केवळ ४६ जागा मिळाल्या तर फक्त १६ जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. नाना पटोले देखील अतिशय कमी मतांनी विजयी झाले. यामुळे काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढावली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये फेरबदल होणार आहेत प्रदेशाध्यक्ष पदासाठी पाच जणांची नावे चर्चेत आहेत. नाना पटोले यांच्या जागी आता विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर, सुनील केदार या पाच जणासह इतर काही नावांची चर्चा सुरु आहे. त्यामुळे आता नाना पाटोलेच्या जागी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर आपल्याला प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती. पण अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही.

नाना पटोले यांची गटनेतेपदी निवड केली जाणार आहे. तर मुख्य प्रतोद पदी अमित देशमुख यांची निवड होणार असल्याची चर्चा जोरात सुरु आहे. पण पटोले यांच्या नावाला वडेट्टीवार यांचा विरोध आहे. त्यामुळे आता काँग्रेस हायकमांड या निवडीबाबत निर्णय घेणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या आगामी बैठकीकडे लक्ष असणार आहे.