
न्यायालयाने गुन्हा रद्द करण्याची परवानगी नाकारली, काय होता वाद, कोण आहे क्रिकेटपटू

मुंबई – क्रिकेटर पृथ्वी शॉ आणि सोशल मीडिया इंफ्लुएंसर सपना गिल प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी सांगितले की पृथ्वी शॉने सपना गिलवर केलेल्या आरोपांमध्ये पुरेशी तथ्ये आहेत. त्यामुळे सपना गिलच्या अडचणी वाढल्या आहेत.

फेब्रुवारी २०२४ मध्ये सपना गिल आणि तिच्या मैत्रिणींनी पृथ्वी शॉकडे सेल्फी मागितला होता. मात्र पृथ्वीने सेल्फी नाकारला. यानंतर गाडीवर हल्ला केला. तसेच ५० हजार रुपयांची मागणी करत पैसे न दिल्यास खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी गिलने दिली होती. याप्रकरणी शॉचा मित्र आशिष यादव याने तक्रार दाखल केली होती. सपना गिलने पृथ्वी शॉविरुद्ध सुरू केलेली कारवाई रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. सपना गिलने या प्रकरणी एफआयआर रद्द करण्यासाठी कोर्टात धाव घेतली होती. खटला रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर विचार करण्यास न्यायालयाने अनिच्छा दर्शवली. या खटल्यात आरोपपत्राचा आढावा घेण्यावर न्यायालयाने भर दिला. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती एसएम मोडक यांच्या खंडपीठाने याचिकेवर विचार करण्यास नकार दिला. एफआयआरमध्ये गुन्ह्याचा स्पष्टपणे उल्लेख आहे, ज्यावरून असे दिसून येते की तुमच्याविरुद्ध काही पुरावे आहेत, असे न्यायालयाने गिलच्या वकिलाला सांगितले. न्यायमूर्ती कोतवाल यांनी गिलच्या वकिलाला ट्रायल कोर्टात डिस्चार्ज याचिका दाखल करण्याचा विचार करण्याचा सल्ला दिला. आम्ही रद्द करणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

आशिष यादवच्या तक्रारीवरून ओशिवरा पोलिसांनी काही जणांना अटक केली. गिलने नंतर शॉ आणि काही पोलिसांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. खंडपीठाने या याचिकेची सुनावणी ३ एप्रिलपर्यंत तहकूब केली आहे.









