
आंदोलनाला दांडी मारल्याने पक्षाची मोठी कारवाई, पक्षातील मतभेद उघड, काय घडलं

नागपूर – विधानसभा निवडणूकीतील दारूण पराभवानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होत आहेत. त्यातच संघ मुख्यालयाला घेराव घालण्यासाठीच्या आंदोलनावरून युवक काँग्रेसमध्ये जोरदार वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रविवारी युवक काँग्रेसने नागपुरात संघ मुख्यालयावर जाऊन संघप्रमुख मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्याचे आंदोलन अचानक पुकारले होते. मात्र या आंदोलनात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चिब, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासह काही कार्यकर्ते सहभागी झाले असताना अनेकांनी या आंदोलनाला दांडी मारली होती. त्यामुळे काँग्रेसने पदावरून दूर केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये विजय वडेट्टीवार यांची कन्या आणि युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांचे सुपुत्र युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस केतन ठाकरे, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अनुराग भोयर, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मिथिलेश कन्हेरे यांच्यासह अनेक युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. पण त्यामुळे राजकीय वर्तुळात युवक काँग्रेसमध्ये जोरदार वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
‘अयोध्येत २२ जानेवारी २०२४ रोजी श्री रामाची प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हा देश खऱ्या अर्थाने मुक्त झाला’ असे वक्तव्य सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केलं होते. त्यांच्या या वक्तव्याविरोधात नागपुरात युवक काँग्रेसने आक्रमक पवित्र घेत आंदोलन पुकारले होते.









