मोक्का कारवाईतील मुख्य आरोपी पुण्याहून पोहचला नेपाळला ; नेपाळहून पुण्यात परत येताच पुणे विमानतळावरच आरोपीला अटक

भेकराईनगरमध्ये आम्ही भाई असल्याचे सांगून १० ते १५ जणांनी दहशत माजवत वाहनांची तोडफोड केली होती. या टोळीवर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. त्यांच्यातील मुख्य आरोपी नेपाळला पळून गेले होते. नेपाळहून विमानाने परत आल्याची माहिती मिळताच खंडणी विरोधी पथकाने पुणे विमानतळावर दोघांना पकडले.

राहुल बाळासाहेब तुपे (वय ३४) आणि सागर रमेश धुमाळ(वय ४३) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. याबाबत अजय अशोक जगदाळे (वय ३०) यांनी हडपसर पोलिसांकडे २५ ऑगस्ट रोजी फिर्याद दिली होती.मिलींद तुपे याला फिर्यादी यांनी चार ते पाच वर्षांपूर्वी जमीन विकली होती. मिलिंद तुपे याच्याकडे विक्री केलेल्या जमिनीचे पैसे मागितले असता तो फिर्यादीला पैसे देणार होता. परंतु, मिलिंद तुपे याचा मित्र राहुल तुपे याने कोल्हापूर येथील तुरुंगातून फोन करुन धमकी दिली की, मिलिंद तुपे याच्याकडे पैसे मागू नको, नाहीतर तुला मारुन टाकीऩ तेव्हा पासून त्यांच्यात वाद होता. राहुल तुपे याच्याविरोधात खून, तसेच खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

२४ ऑगस्ट रोजी रात्री फिर्यादी हे घरी आल्यानंतर मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास राहुल तुपे, सचिन तुपे व त्यांच्या १० ते १५ साथीदारांनी घरासमोर पार्क केलेली हुंडाई क्रेटा, अ‍ॅल्टो कारची तोडफोड करुन दहशत माजविली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी मोक्का कारवाई केली होती.गुन्हा दाखल झाल्यानंतर राहुल तुपे व सागर धुमाळ हे फरार झाले होते. आरोपींबाबत खंडणी विरोधी पथकाने माहिती काढल्यावर ते नेपाळ येथून लखनौ आले असून लखनौ हून पुण्यात विमानाने येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी पथक तयार करुन रवाना केले. विमानतळावर जाऊन पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले व पुढील तपासासाठी हडपसर पोलिसांच्या ताब्यात दिले.