
लाडक्या बहिणींना ‘या’ तारखेला मिळणार जुलै महिन्याचा हप्ता, इतके कोटी रुपये बहिणींसाठी वर्ग

मुंबई – रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाच्या आधीच लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आली आहे.

नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार असल्याने याआधीच लाडक्या बहिणींना मोठी भेट दिली आहे. राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी निधी वर्ग करून देण्यात आला आहे. महिला व बालविकास विभागाने जीआर म्हणजे शासन निर्णय जारी करून जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 2,984 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे. 30 जुलै 2025 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी निधीची उपलब्धता झाली असल्याने आता येत्या दोन-तीन दिवसात प्रत्यक्षात लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसा जमा होईल अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. महायुती सरकारनं आधीच लाडकी बहीण योजनेसाठी 28,290 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याच तरतुदीतून आता 2,984 कोटी रुपये जुलै महिन्याच्या हप्त्यापोटी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहेत. दरम्यान, तरतूद करण्यात आलेल्या रकमेतून जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी 2984 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण 12 हप्ते देण्यात आले आहेत. या योजनेचा बारावा हप्ता म्हणजेच जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच देण्यात आला आणि आता जुलै महिन्याच्या हप्त्याची तारीख सुद्धा समोर आली आहे. सोशल मीडियामध्ये रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्रित दिला जाऊ शकतो असा दावा करण्यात आला होता. मात्र सरकारने काल जारी केलेल्या शासन निर्णयानुसार यावेळी देखील महिलांना फक्त एकाच महिन्याचे म्हणजे जुलै महिन्याचे पैसे मिळणार आहेत. लाडकी बहिण योजना ही महायुती सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना असून या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात.
राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ तब्बल १४ हजार पुरुषांनीही घेतला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांवर कारवाई केली जाईल अशा इशारा अदिती तटकरे यांनी दिला आहे. तसेच अर्ज छाननी करुन कडक कारवाई केली जाणार आहे.









