
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन, यवतमाळ येथे ३३५ कोटी रु.च्या विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन

यवतमाळ – आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या असून, त्यासाठी देशात १ लक्ष कोटी रू. निधी उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्रातही आदिवासी समाजासाठी घरे, रस्ते, वीज, पाणी, वसतिगृह व रोजगार अशा सुविधांसाठी योजना-उपक्रम राबविण्यात येत असून, पुढील ३ वर्षांत आदिवासींच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडेल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते यवतमाळ येथे एकूण ३३५ कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन तसेच विविध उपक्रमांचा शुभारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले की, आदिवासी समाजासाठी ५४ हजार कुटुंबांना घरे, नळांद्वारे पाणी, उपचारासाठी दवाखाने, वसतिगृह अशा अनेक सुविधा वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी विकासासाठी ज्या योजना व उपक्रम आणले, तशी भरीव कामगिरी त्यापूर्वी झालेली नाही. आदी कर्मयोगी योजनेतून जिल्ह्यातील ३६६ गावांची निवड झाली आहे. योजनेतून राज्यातील ३० लाख युवकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. त्यातून स्थानिक नेतृत्वाचा विकास होणार आहे. शासनाने अनुकंपा तत्वावरील सेवाप्रवेशाचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला. त्यात पंधरा हजार युवकांना अनुकंपातून नियुक्ती देण्यात येणार आहे. सुमारे ३५ मे. वॅट सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने शेतीला १२ तास दिवसा वीज मिळत आहे. शेतकऱ्यांना दिवसा दहा तास मोफत वीज देण्याचेही नियोजन आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांसाठी आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने निधीची कमतरता पडू देणार नाही. पावसाने जिल्ह्यात शेती, घरे, पशुधन यांचे नुकसान झाले. त्याची भरपाईही लवकरात लवकर अदा केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यात अनुकंपा तत्वावर २७ उमेदवारांना सेवेत घेण्यात आले. त्यातील ४ उमेदवारांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.विविध विभागांतर्फे योजनांची माहिती देणारे कक्षही उभारण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
फडणवीस यांच्या हस्ते यवतमाळ येथे आज एकूण ३३५ कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण भूमिपूजन तसेच उपक्रमांचा शुभारंभ झाला. त्यात आदिवासी विकास विभागाच्या पाच वसतिगृहे व इतर कामे मिळून ५१ कोटी रुपये किंमतीच्या कामांचा समावेश आहे. तसेच बांधकाम विभागाची ६७ कोटींची कामे मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजनेत ११ सौर ऊर्जा प्रकल्प व इतर कामांसाठी १५८ कोटी व इतर विविध विभागांच्या ५९ कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे.









