
एक अतिशय अजब आणि हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. यात एका महिलेला मृत समजून तिच्यावर अंत्यसंस्कार केले जात होते. मात्र, ती महिला दुसऱ्या शहरामध्ये चक्क जिवंत सापडली. पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी या महिलेला तिच्या पतीपर्यंत पोहोचवलं. घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील आहे.

पोलिसांनी सांगितलं की, बांसगांवचे रहिवासी के राम सुमेर यांनी अलीकडेच पोलिसांना कळवलं होतं की त्यांची पत्नी फूलमती १५ जून रोजी बेपत्ता झाली होती. त्यांनी सांगितलं की, १९ जून रोजी उरुवा मार्केटमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला होता. जी आपली पत्नी असल्याचं समजून सुमेर यांनी तिच्या मृतदेहावर अंतिम संस्कारही केले.पोलिसांनी सांगितलं की, शवविच्छेदन तपासणीत महिलेचा गळा दाबून खून झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी सांगितलं की, तपासादरम्यान पोलिसांनी फुलमतीचा मोबाईल फोन ट्रेस केला असता तो गोरखपूरपासून ६०० किमी अंतरावर असलेल्या झाशी जिल्ह्यात सक्रिय आढळून आला. कॉल डिटेल रेकॉर्डमध्ये शुभम नावाच्या व्यक्तीच्या नंबरवर सतत संभाषण झाल्याचं समोर आलं.

चौकशी केली असता शुभमने पोलिसांना सांगितलं की, फुलमती जिवंत आहे आणि त्याने तिला गोरखपूरहून झाशीला आणलं होतं. त्यानंतर पोलिसांना शुभमने सांगितलेल्या ठिकाणी फूलमती सापडली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक जितेंद्र कुमार तोमर यांनी सांगितलं की, फुलमतीची जबानी नोंदवल्यानंतर तिला तिच्या पतीसह परत पाठवण्यात आलं आहे. त्यांनी सांगितलं की, राम सुमेर, फूलमती, शुभम आणि ज्या महिलेवर अंतिम संस्कार करण्यात आले त्या महिलेचे काय संबंध होते याचा तपास केला जात आहे.









