मिहिरच्या आत्महत्येमुळे प्रसिद्ध अभिनेत्रीला बसला धक्का

न्यायाची अपेक्षा व्यक्त, केले हे आवाहन, म्हणाली या बातमीने मी पूर्णपणे उद्धवस्त…

चेन्नई – केरळमधील एर्नाकुलम येथे एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने आत्महत्या केली आहे. शाळेतील धोकादायक रॅगिंग आणि गुंडगिरीला कंटाळून त्याने हे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर सगळीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे. आता अभिनेत्री देखील याविरोधात बोलताना दिसत आहेत.

मिहिर असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. त्याच्या मृत्यूबद्दल अभिनेत्री समंथाने चिंता व्यक्त केली आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर “या बातमीने मी पूर्णपणे उद्धवस्त झाले आहे” असे म्हणत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. समंथा म्हणाली की, “मिहीरचा दुर्देवी मृत्यू हा आपल्याला बुलिंग, छळ आणि रँगिंगविरुद्ध दिलेला इशारा आहे. या गोष्टींकडे आपण ‘काहीही परिणाम न होणाऱ्या परंपरा’ किंवा ‘प्रवेशापूर्वीची परंपरा’ असं म्हणत कानाडोळा करु शकत नाही हेच दर्शवतात. या गोष्टी हिंसकच आहेत. सायकोलॉजिकली, इमोश्नली आणि कधीतरी अगदी फिजिकलीही त्याचा फटका बसतो. आपण रॅगिंगविरोधातील कायदे कठोर केले आहेत. तरीही आपल्या विद्यार्थ्यांना हे सारं सहन करावं लागतं. ते बोलायला घाबरतात. याचा काय परिणाम होईल याला ते घाबरतात. आपलं कोणी ऐकून घेणार नाही याची त्यांना भिती असते. आपण कुठे कमी पडतोय?” असा सवाल समंथाने विचारला आहे. तसेच “केवळ श्रद्धांजली देऊन हे प्रकरण थांबण्यासारखं नाही. या प्रकरणात कठोर कारवाई केली पाहिजे. मला अपेक्षा आहे की यंत्रणा याच्या तळाशी जातील आणि यंत्रणांकडून सत्याचा आवाज दाबला जाणार नाही. अशी अपेक्षा तिने व्यक्त केली आहे. पोस्टच्या शेवटी समंथाने मिहीरला न्याय द्या असं सांगणारा #JusticeForMihir हा हॅशटॅग वापरला आहे. या पोस्टनंतर अनेकांनी समंथाला पाठिंबा दिला आहे.

१५ जानेवारीला मिहीर नावाच्या विद्यार्थ्याने त्रिपुनिथुरा, एर्नाकुलम येथे असलेल्या त्याच्या अपार्टमेंट इमारतीच्या २६ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली होती. आत्महत्येच्या आधी त्याला बळजबरी शौचालयात नेण्यात आले, त्याला टॉयलेट सीट चाटायला लावली, फ्लश करताना त्याचं डोकं टॉयलेटमध्ये घालत अमानुष छळ करण्यात आला होता.