
विकास घडमोडे यांच्या स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुलले, स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

बार्शी दि १५ (प्रतिनिधी)- आज सा-या देशभरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. दहिटणे येथे स्वातंत्र्यदिनाचे अवचित्य साधत विकास घडमोडे यांनी जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्य वाटप केले आहे. दरवर्षी ते साहित्य वाटपाचा उपक्रम राबवत असतात.


दहिटणे गावाला स्वातंत्र्याचा वारसा लाभलेला आहे स्वातंत्र्यसैनिक तुळशीदास जाधव यांच्या नेतृत्वाखाली दहिटणेकरांनी लढा उभा केला होता. त्याच दहिटणे गावात स्वातंत्र्यदिनानिमित्त उत्साह दिसून येत होता. पावसाने रस्ते चिखलमय झाले असले तरीही उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. प्रभात फेरी, कवायत मुलांची देशभक्तीपर गीते, भाषणे यांनी पूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले होते. विकास घडमोडे दरवर्षी त्यांचे दिवंगत वडील मल्लिकार्जुन घडमोडे, आई चंपाबाई घडमोडे आणि दिवंगत बंधू साईनाथ घडमोडे यांच्या स्मरणार्थ शालेय साहित्याचे वाटप करत असतात यावर्षी त्यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पाटी आणि कंपास बाॅक्सचे वाटप केले. यावेळी विशेष म्हणजे शालेय साहित्य भेटल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. विकास घडमोडे यांच्या या उपक्रमाचे शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी काैतुक करत आभार मानले आहेत. घडमोडे यांनीही आगामी काळात हा उपक्रम राहवत राहण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी विविध परिक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहनदेखील करण्यात आले यावेळी आजी माजी लोकप्रतिनिधी, शाळा समितीचे पदाधिकारी मुख्याध्यापक, शिक्षक विद्यार्थी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.











