बीपीच्या औषधात गुंगीचे औषध टाकून बेशुद्ध करत चालकाने मालकाला लुबाडले..

(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – ज्येष्ठ नागरिकाला बी पी शुगरच्या औषधामध्ये गुंगीचे औषध टाकून त्यांना बेशुद्ध करुन चालकाने त्यांच्या अंगावरील दागिने, घरातील मौल्यवान साहित्य असा ६ लाख ४१ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. ही घटना थेरगाव मधील स्विस काऊंट्री सोसायटीत बुधवारी सकाळी ८ ते ९ वाजण्याच्या दरम्यान घडली.

याबाबत वासुदेव भालचंद्र आडवाणी (वय ६८) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रफिक ऊर्फ समीर जमादार (वय ४२) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वासुदेव आडवाणी हे कापड व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे रफिक जमादार हा चालक म्हणून कामाला होता. फिर्यादी हे बुधवारी सकाळी बेडरुममध्ये होते. त्यावेळी रफिक याने त्यांना औषध दिले. हे पिल्यानंतर फिर्यादी यांना गुंगी आली. ते बेशुद्ध पडले.

त्यानंतर रफिक याने त्यांच्या हातातील साडेतीन लाख रुपयांचे साडे चार तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट, १ लाख ८० हजार रुपयांची अडीच तोळ्याची सोन्याची सोनसाखळी, १ लाख रुपयांचे चैनमधील गणपती, पाकिटातील ६ हजार रुपये रोख, गाडीची चावी, गाडीचे आर सी बुक, बँक ऑफ बडोदाचे क्रेडिट कार्ड असा ६ लाख ४१ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. काही तासांनी त्यांना शुद्ध आल्यावर अंगावरील दागिने नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. परंतु, गुंगीच्या औषधामुळे ते काही करु शकत नव्हते. पोलिसांना याची गुरुवारी रात्री उशिरा माहिती मिळाली. त्यानंतर वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक पोटे तपास करीत आहेत.