पार्सलची चौकशी करण्यासाठी गेलेल्या स्विगी कंपनीच्या डिलेव्हरी बॉयला मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट व्यवस्थापकासह त्याच्या साथीदारांनी बेदम मारहाण केल्याची घटना नाशिक पुणे महामार्गावरील विजय ममता थेअटर परिसरात घडली.या घटनेत डिलेव्हरी बॉय जखमी झाला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मॅकडोनाल्ड रेस्टॉरंटचे व्यवस्थापक कुणाल शिरसाठ (रा.जेलरोड) व त्यांचे दोन ते तीन साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहे. याबाबत महेशकुमार नारायण सोळंके (३४ रा.आडकेनगर,जयभवानीरोड) यांनी फिर्याद दिली आहे. सोळंके स्विगी कंपनीत पार्सल पोहचविण्याचे काम करतात. गेल्या शुक्रवारी (दि.१४) रात्री ही घटना घडली. सोळंके स्विगी कंपनीस प्राप्त झालेल्या आॅनलाईन आॅर्डर बाबत विचारपूस करण्यासाठी गेले असता.
व्यवस्थापक शिरसाठ व त्यांच्या साथीदारांनी किरकोळ कारणातून कुरापत काढून हा वाद घातला. यावेळी संतप्त टोळक्याने शिवीगाळ,धक्काबुक्की व दमदाटी केली असता एकाने त्यांच्या डोक्यात काही तरी वजनी वस्तू मारली. या घटनेत सोळंके यांच्या डोक्यास मोठी दुखापत झाली असून उपचारानंतर त्यांनी पोलीसात धाव घेतली आहे. अधिक तपास पोलीस नाईक हिवाळे करीत आहेत.