देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ मुंबईत उभे राहणार

राज्यात ३० जिल्ह्यात विमानवाहतूक सुविधा वाढविणार, लवकरच उडान यात्री कॅफे सुरू करणार, फडणवीस यांची माहिती

मुंबई – भारताला ‘मेरीटाईम पॉवर’ बनविणारे वाढवण बंदर जसे देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर पोर्ट’  होणार आहे त्याचप्रमाणे सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ मुंबईत उभारणार असून जे मुंबईतील तिसरे एअरपोर्ट असेल. याचे काम लवकरच सुरू होईल. राज्यात सध्या २४ जिल्ह्यांमध्ये विमानतळ आणि धावपट्टीची सुविधा आहे  आगामी कालावधीत ३० जिल्ह्यामध्ये या सुविधा वाढवत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हॉटेल ताज लँडस एंड वांद्रे येथे केंद्रीय नागरी  हवाई मंत्रालय मार्फत आयोजित ‘वेस्टर्न रीजन मिनिस्टर कॉन्फरन्स’चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय नागरी हवाई मंत्री के.राममोहन नायडू, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारत ही जगात सर्वात वेगाने विकसित होत असलेली अर्थव्यवस्था आहे. जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत आहे.भारताला विकासाकडे नेणाऱ्या रोबोस्ट एव्हिएशन इकोसिस्टीमची अत्यंत आवश्यकता आहे. काही वर्षापर्यंत विमानसेवा हा फक्त केंद्रांचाच विषय आहे अशी स्थिती होती पण आता परिस्थिती बदलली आहे. जे राज्य विमान वाहतूक हा विषय प्राधान्याने बघणार नाही ती प्रगतीत मागे पडतील अशी स्थिती असल्याने हा विषय महत्वाचा ठरत आहे. राज्यात ग्रीन फील्ड आणि ग्राउंड फिल्ड विमान वाहतुकीला पूरक अशा सर्व सुविधा तयार करत आहोत. यासाठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता आहे. लवकरच भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनेल. या प्रगतीच्या वाटेमध्ये विमान वाहतुकीचा मोठा वाटा असेल. राज्यात सध्या 24 जिल्ह्यांमध्ये एअरपोर्ट आणि धावपट्टीची सुविधा आहे. या सुविधा आगामी कालावधीत 30 जिल्ह्यांमध्ये वाढवण्यात येणार आहेत. धावपट्ट्या अजून अपग्रेड करण्यात येत आहेत. विमातळ व रात्री विमान उतरवण्याची सुविधा उद्योजकांना व गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत असते. गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यामध्ये नवीन एअरपोर्ट बनवणार आहोत त्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला सादर केला आहे. गडचिरोलीमध्ये दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे यामध्ये वाढ होऊन ती दहा लाख कोटी पर्यंत वाढेल असा विश्वास आहे. दरम्यान 2030 पर्यंत महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी राज्य बनवणार आहे. एमएमआर प्रदेश व वाढवण बंदर परिसर येथेच १.५ ट्रिलियन अर्थव्यवस्था उभी राहण्याची क्षमता निर्माण होईल. महाराष्ट्रात विमानक्षेत्रातील उद्योजकांचे स्वागत आहे, असे सांगितले.

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री के.राममोहन नायडू म्हणाले की, विमान वाहतूक क्षेत्रात केंद्र व राज्य यांच्या समन्वयासाठी नोडल अधिकारी नेमणार असून केंद्र शासन लवकरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेले ‘उडान यात्री कॅफे’ सुरू करणार आहे. सर्वसामान्य माणसाचे जीवन सुसह्य करणारे निर्णय केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालय घेत आहे असे केंद्रीय नागरी हवाई मंत्री के.राममोहन नायडू यांनी सांगितले.