
नाना पटोले होणार पदमुक्त, काँग्रेसकडून या नेत्यांचा पत्ता कट, या कारणामुळे झाली निवड

मुंबई – महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी डॉ. नितीन राऊत यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. दिल्ली विधानसभेच्या निकालानंतर काँग्रेसकडून याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाना पटोले लवकरच पदमुक्त होण्याची शक्यता आहे.

लोकसभेत यश मिळाल्यानंतर काँग्रेसला विधानसभेत पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच विद्यमान अध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात पक्षात असंतोष होता. तर दुसरीकडे नाना पटोले यांनीही जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली होती. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी दुसऱ्या नेत्याचा शोध सुरू होता. सुरूवातीला बंटी पाटील, विश्वजित कदम, अमित देशमुख यांची नावे चर्चेत होती. पण त्यांनी नकार दिल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण आणि विजय वडेट्टीवार यांची नावे चर्चेत होती. पण आता अचानक नितिन राऊत यांचे नाव चर्चेत आले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील जागांचे समीकरण पाहता, नितीन राऊत यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले आहे. पण नितीन राऊत यांच्या मुलावर युवक काँग्रेसमधील वादानंतर कारवाई करण्यात आल्याने नितिन राऊत यांच्या नावाला विरोध होण्याची शक्यता आहे. आता दिल्लीतील पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
देशात मुक्त वातावरणात पारदर्शकपणे निवडणुका व्हाव्यात, त्यावर करडी नजर ठेवण्यासाठी काँग्रेसने ईगल समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील माजी मंत्री नितीन राऊत यांचाही समावेश करण्यात आला आहे. समितीत समावेश असलेले ते राज्यातील एकमेव नेते आहेत.









