
मुंबई – आपल्या देशात राजकारणी लोकांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल जाणून घेण्याची अनेकांची इच्छा असते. त्यात मुख्यमंत्री कोण आहेत. त्यांची संपत्ती किती याबद्दल देखील लोकांना कुतुहल असते. आता एका संस्थेने देशातील सर्व मुख्यमंत्री आणि त्यांच्या संपत्तीची माहिती जाहीर केली आहे.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने जाहीर केलेल्या नव्या अहवालातून भारतातील मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीचा तपशील समोर आला आहे. यानुसार भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण? आणि गरीब कोण? हे देखील स्पष्ट झाले आहे. त्यानुसार आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांच्याकडे ९३१ कोटींची संपत्ती आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू हे दुसऱ्या क्रमाकांवर असून त्यांची संपत्ती ३३२ कोटी एवढी आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे तिसऱ्या स्थानावर असून त्यांची संपत्ती ५१ कोटी इतकी आहे. कर्जाच्या बाबतीत पेमा खांडू यांच्यावर सर्वाधिक म्हणजे १८० कोटींचे कर्ज आहे. तर सिद्धरामय्या यांच्यावर २३ कोटी तर नायडू यांच्यावर १० कोटींचे कर्ज आहे. गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार केल्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी फक्त १५ लाख रुपयांच्या संपत्तीसह सर्वात गरीब मुख्यमंत्री आहेत. त्यानंतर जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे ५५ लाख रुपयांच्या मालमत्तेसह दुसऱ्या क्रमांकाचे गरीब मुख्यमंत्री आहेत, तर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन १.१८ कोटी रुपयांच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकाचे गरीब मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकूण संपत्ती १३.२७ कोटी रुपये आहे, तर त्यांच्यावर ६२ लाखांचे कर्ज आहे.

एडीआरने आपल्या अहवालात प्रति मुख्यमंत्री सरासरी मालमत्ता ५२.५९ कोटी रुपये असल्याचे नमूद केले आहे. २०२३-२०२४ मध्ये भारताचे दरडोई निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न सुमारे १,८५,८५४ रुपये होते, तर मुख्यमंत्र्यांचे सरासरी उत्पन्न १३,६४,३१० रुपये आहे, जे भारताच्या सरासरी दरडोई उत्पन्नाच्या ७ पट अधिक आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार आकडेवारीनुसार देशातील ३१मुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती १६३० कोटी रुपये आहे.









