(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे)- ओ एल एक्स वर मोटारसायकल विक्रीच्या जाहिरातीला प्रतिसाद देऊन एक तरुण गाडी पाहण्यासाठी आला़ तरुणाने त्याला गाडीवर काही अंतर फिरविले. त्यानंतर त्याने मी चालवून पहातो, असे सांगून मोटारसायकल घेऊन त्याने धुम ठोकली. याबाबत राजेश वासुदेव पदमणे (वय २९) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शुभम पवार नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची पल्सर मोटारसायकल विकण्याची जाहिरात ओ एल एक्स अॅपवर केली होती. तिला शुभम पवार नावाच्या तरुणाने प्रतिसाद देऊन संपर्क साधला होता. तो मोटारसायकल विकत घ्यायला तयार होता. फिर्यादी यांनी त्याला मोटारसायकलचे फोटो, आर सी बुकचे फोटो पाठवले. त्यानंतर २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता तो चाकण बस स्टँडवर आला. तेथे फिर्यादीही आले.
फिर्यादी व आरोपी हे मोटारसायकलवरुन आळंदी फाटा रोडने घाटाचे मार्गे गेले. वाटेत शुभम पवार हा फिर्यादी यांना मोटारसायकल चालवून बघायची आहे, असे म्हणाला. फिर्यादी यांनी मोटारसायकल त्याला चालवायला दिली. ते रस्त्याच्या कडेला थांबले. शुभम पवार हा चालवायला म्हणून मोटारसायकल घेऊन गेला तो परत आलाच नाही. त्यांनी फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही. पोलीस हवालदार भोसले तपास करीत आहेत.