रस्त्यावरील खड्ड्यातील पाणी अंगावर उडाल्याने चौघांची कारचालकाला बेदम मारहाण..

पुणे – रस्त्यात पडलेल्या खड्ड्यात साठलेले पावसाचे पाणी एका कारचालकाला महागात पडले.मुंबईहून भावाला भेटण्यासाठी आलेल्या कारचे चाक रस्त्यावरील खड्ड्यातील साठलेल्या पाण्यातून गेले. हे पावसाचे पाणी अंगावर उडाल्याने दुचाकीवरील चौघांनी कारचालकाला बेदम मारहाण करुन जखमी केले. याबाबत यश विजय मनवारी (वय २९) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ही घटना मुंढवा केशवनगर येथील जनसेवा बँकेच्या समोरील सार्वजनिक रोडवर सोमवारी सायंकाळी पावणेसहा वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यश मनवानी हे भावाला भेटण्यासाठी मुंबईहून आले होते. कारने जात असताना रोडवरील खड्यात साठलेले पावसाचे पाणी हे रोडने जाणार्‍या मोटारसायकलस्वाराच्या अंगावर उडाले. त्यामुळे चिडलेल्या मोटारसायकलस्वाराने कारला थांबविण्यास भाग पाडले. मोटारसायकलस्वाराने तू अंगावर पाणी का उडवले. कार नीट चालवता येत नाही का, तुला दिसत नाही का असे बोलून शिवीगाळ करु लागला.

त्याने फिर्यादी यांना हाताने मारहाण करुन जवळच पडलेली लाकडी काठी उचलून फिर्यादी यांच्या पाठीवर, डाव्या पायाच्या पिंडरीवर, उजव्या हाताच्या अंगठ्याजवळ व कमरेच्या उजव्या बाजूला काठीने मारुन जखमी केले. त्यांच्या कारच्या उजव्या बाजूच्या पुढील दरवाज्यावर काठीने मारुन ते चेंबून दरवाजाचे नुकसान केले. पाठीमागे बसलेल्याने फिर्यादीस पुन्हा शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन त्यांच्या बाजूला रोडवर थांबलेल्या दोघांनी शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. सहायक पोलीस निरीक्षक उगले तपास करीत आहेत.