भाकरी फिरली! शशिकांत शिंदे पवार गटचे नवे प्रदेशाध्यक्ष

जयंत पाटील यांचा राजीनामा स्वीकारला, एकमताने निवड जाहीर, शशिकांत शिंदेसमोर आव्हानांचा डोंगर

मुंबई – मागील अनेक दिवसापासून जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा होती. आज अखेर यावर पडदा पडला असून शशिकांत शिंदे यांच्या नावाची अखेर पवार गटाच्या नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली आहे. खासदार शरद पवार यांनीच शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आहे.

शशिकांत शिंदे यांची निवड ही एकमताने करण्यात आली. शिंदे हे शरद पवारांचे विश्वासू नेते मानले जातात. त्यामुळे त्यांना ही संधी मिळाल्याची चर्चा आहे. मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर शशिकांत शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या बदलाची चर्चा सुरू होती. सध्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गेल्या सात वर्षांपासून पक्षाची धुरा सांभाळत आहेत. या आधीच्या एका कार्यक्रमात त्यांनी आपल्याला या पदावरून मुक्त करावे आणि नव्या लोकांना संधी द्यावी अशी जाहीर मागणी केली होती. जयंत पाटील यांनी २०१८ साली प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी हाती घेतली होती. त्यानंतर आज अखेर पक्षाला नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी शशिकांत शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवल्यानंतर सुनील भुसारा यांच्याकडून या प्रस्तावाला अनुमोदन देण्यात आले. तसेच उत्तम जानकर यांच्याकडूनही या प्रस्तावाला अनुमोदन देण्यात आले. त्यानंतर शरद पवार यांनी या प्रस्तावावर आपले मत व्यक्त केले. अनिल देशमुख यांनी जे नाव सुचवले आहे, त्या नावाला खासदार अमोल कोल्हे यांनी अनुमोदन दिल आहे. हे नाव आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. या निवडणूक प्रक्रियेत शशिकांत शिंदे यांचे एकच नाव आले आहे, असे शरद पवार म्हणाले. तसेच पुढे त्यांनी शशिकांत शिंदे यांच्या नावाची पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा केली. राज्यात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चर्चा चालू आहे. असे असताना आता शशिंकात शिंदे यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आलेली आहे. त्यामुळे पक्षाला पुन्हा विजयी मार्गावर आणण्याचे आव्हान शशिकांत शिंदे समोर असणार आहे.

शशिकांत शिंदे हे मूळचे जावळी तालुक्यातील हुमगाव येथील रहिवासी आहेत. ते वाणिज्य शाखेचे पदवीधर असून माथाडी कामगारांचे प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. 1999 साली ते पहिल्यांदा आमदार झाले. २००९ ते २०१९ या कालावधीत त्यांनी कोरेगाव मतदारसंघाचे आमदार म्हणून काम केले.