कात्रज येथून पाण्यात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह अखेर सापडला

पुणे शहरात बुधवारी मुसळधार पाऊस झाला. यामुळे अनेक भागात पाणी वाहून आले होते. यादरम्यान सायंकाळी कात्रज लेकटाऊन येथून एक युवक अक्षय साळुंखे, वय २६ वाहून गेल्याची नोंद अग्निशमन दल नियंत्रण कक्षात सायंकाळी सहाच्या सुमारास झाली होती.

त्यानूसार त्याचवेळी अग्निशमन दलाकडून प्रथम गंगाधाम अग्निशमन केंद्र येथून वाहन पाठवत शोध घेण्यात आला होता. परंतू, धरण क्षेञातून वाढता विसर्ग व पाण्याचा प्रवाह पाहता अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे त्यादिवशी शोध घेऊन ही युवक सापडला नाही. दुसऱ्या दिवशी दलाने घटनेचे गांभीर्य ओळखून गंगाधाम व कात्रज अग्निशमन वाहन लेकटाऊन व जनता अग्निशमन वाहन शंकर महाराज मठाजवळ, स्वामी विवेकानंद पुतळा आणि आज कसबा येथील वाहन मनपा जवळील नदीपाञ येथे रस्सी, गळ, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग याचा वापर करत युध्दपातळीवर शोधकार्य करीत होते.

त्याचवेळी आज सकाळी १०:०० वाजता मनपा भवनालगत असलेल्या डेंगळे पुलाखाली एक मृतदेह पाण्यात आढळून आला. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान यांनी जीवरक्षक राजू काची यांच्या मदतीने सदर युवकाचा मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला. या घटनेत पोलिस विभाग, जीवरक्षक, ड्रेनेज विभाग यांचे ही सहकार्य लाभले.