
पुणे – लहान मुलगा कुत्र्याला दगड मारत असल्याने त्याला दगड मारु नको, असे सांगितल्याने त्यांच्या मोठ्या भावाने तरुणाच्या डोक्यात दगड घालून जबर जखमी केले.

याबाबत अथर्व शिवराज लोखंडे (वय १९) याने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दत्ता आडगळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना तळजाई माता वसाहतीतील विनायक हॉटेल चौकात २९ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी याच्याकडे कुत्रा आहे. त्याला फिरायला घेऊन गेला असताना दत्ता आडगळे याच्या लहान भावाने कुत्र्याला मारले होते. फिर्यादी विनायक हॉटेल चौकात थांबला असताना दत्ता आडगळे आला व त्याने फिर्यादीला तु माझ्या लहान भावास काय बोललास, असे म्हणून शिवीगाळ करु लागला. तेव्हा फिर्यादी याने तुझ्या भावाने माझ्या कुत्र्याला मारल्याने, कुत्र्याला मारु नको, असे समजावून सांगत होते,असे सांगितले. पण दत्ता याने काहीही एक न ऐकता फिर्यादीला धक्का देऊन हाताने मारहाण केली. त्याच्या पासून बचावासाठी फिर्यादी पळून जाऊ लागला. तेव्हा दत्ताने त्याला पकडून तेथे पडलेला दगड डोक्यात घालून फिर्यादीला जबर जखमी केले. हवालदार संतोष जोशी तपास करीत आहेत.









