
(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – आपला विरोध असताना मुलीने प्रेमविवाह केल्याचा राग वर्षानंतरही गेला नाही. सासर्याने जावयाशी गोड बोलून बोलावून घेतले आणि मारहाण केली. त्याच्या भाच्याने डोक्यात काचेची बाटली फोडण्याचा प्रकार समोर आला आहे़ हडपसर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. याप्रकरणी काळेपडळ येथे राहणार्या एका २७ वर्षाच्या तरुणाने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी राजेंद्र दगडु बनकर, सोपान शिंदे , गणेश शिंदे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार मेगा सेंटर येथील कार बाजारवरील शॉपवर बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी राजेंद्र बनकर यांच्या मुलीशी गेल्या वर्षी प्रेमविवाह केला आहे. त्यामुळे बनकर त्यांच्यावर नाराज असून ते फिर्यादी यांना नेहमी शिवीगाळ करत असतात. बुधवारी सायंकाळी बनकर यांनी फिर्यादी यांना फोन करुन आमचा राग गेलेला आहे़. तुम्ही दोघे या, आपण मिटवून घेऊ, असे सांगितले.

त्यानुसार ते आपल्या पत्नीला घेऊन मेगा सेंटरजवळील कार बाजार येथील पापाशेट पठाण यांच्या शॉपवर आले. तेथे राजेंद्र बनकर, त्यांचे दोन भाचे सोपान शिंदे व गणेश गायकवाड बसले होते. बोलत असताना बनकर यांनी दोघांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दमदाटी करुन मारहाण करु लागले. त्यावेळी सोपान शिंदे याने त्याच्याजवळ असलेली काचेची बाटली फिर्यादी यांच्या डोक्यात मारली. त्यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागल्याने फिर्यादी आरडाओरडा करु लागले. हे पाहून लोकांनी त्यांची सुटका केली. काचेची बाटली डोक्यात मारल्याने तेथे तीन टाके पडले आहेत. हवालदार उमेश मानकर तपास करीत आहेत.









