१५० दिवसांचा कार्यक्रम हा जनतेशी शासनाला जोडणारा सेतू

शंभर दिवस मोहिमेंतर्गत प्रमाणपत्र वितरण व सायकल बँक लोकार्पण सोहळा, अजित पवारांचे प्रतिपादन

पुणे – शासनातर्फे सुरू असलेला १५० दिवसांचा कार्यक्रम ही प्रशासकीय मोहीम नसून जनतेशी शासनाला जोडणारा सेतू आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयातील झुंबर हॉल येथे जिल्हा परिषदेमार्फत आयोजित शंभर दिवस मोहिमेंतर्गत प्रमाणपत्र वितरण व सायकल बँक लोकार्पण कार्यक्रमात पवार बोलत होते.

पवार म्हणाले, राज्य शासनातर्फे 100 दिवस मोहीम राबविण्यात आली होती या मोहिमेत विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार व त्यांच्या टिमने चांगले काम केले असून अनेक विभागांनी उत्कृष्ट काम केले आहे. शासनाने या मोहिमेसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले होते. या मोहिमेत चांगले काम झाल्यामुळे आता 150 दिवसांची मोहीम हाती घेतली आहे. विभागांनी अशा उपक्रमात सातत्य ठेवले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करुन श्री. पवार पुढे म्हणाले, विविध जिल्ह्यामध्ये चांगले काम झाले असून ते इतर जिल्ह्यात राबविले जावे, असा आमचा प्रयत्न आहे. विविध कार्यालयांनी जुनी पद्धत बदलून आधुनिक एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन कामाच्या अनावश्यक टप्प्यांना कात्री लावून नागरिकांचा वेळ व श्रम वाचवण्यासाठी एक प्रणाली उभारली गेली आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध विभागांच्या योजना सामान्य माणसांपर्यंत, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत कशा पाहोचवता येतील यासाठी शासन प्रयत्न करत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गोरगरीबांची मुल शिकत असतात त्यांना विविध योजनांचा फायदा मिळण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत विविध उपक्रम राबविले जातात. पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधून हुशार मुला-मुलींची नासामध्ये 25 व इस्त्रोमध्ये 50 विद्यार्थी पाठविण्यासाठी आयुका संस्थेमार्फत निवड करुन त्यांचा खर्च जिल्हा वार्षिक योजनेतून करण्यात येणार आहे. अशा प्रकारचे विविध उपक्रम राबविल्याबाबत पवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांचे कौतुकही केले.

जिल्हा परिषदेच्या ८०४ शाळांमधील १३ हजार १०६ मुलींना सायकलींची आवश्यकता असून पहिल्या टप्प्यात ४ हजार ५०० विद्यार्थींनींना सायकलींचे वाटप करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात ९ हजार सायकलींची आवश्यकता असून त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी व संस्थांनी पुढे येऊन मदत करावी, असे आवाहन पवार यांनी केले.