भयानक ! पत्नीच्या मृत्यूनंतर वडिलांनीच चक्क आपल्या २ वर्षांच्या मुलाला विकलं..

मुंबई – मुंबईतून एक अतिशय धक्कादायक, हद्य पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. मुंबईच्या अँटॉप हिलमध्ये एक इसमाने त्याच्या पोटच्या गोळ्याची विक्री केली आहे. त्याने त्याच्या अवघ्या २ वर्षांच्या मुलाला अवघ्या १.६ लाख रुपयांसाठी विकून टाकल्याचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी पित्यासह चौघांविरूद्ध मानवी तस्करी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वडाळ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अँटॉप हिलच्या विजयनगर येथील हा धक्कादायक प्रकार आहे. अमर धीरेन सरदार यांची मुलगी काजल ही विजयनगर येथे रहात होती. तिने आरोपी अनिल पूर्वया याच्याशी दुसरं लग्न केलं होतं. यांना एक दोन वर्षांचा मुलगाही होता. मात्र दुर्दैवाने काही दिवसांपूर्वी काजलचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी अनिल व त्याचा मुलगा हे दोघेच घरी रहायचे. काजलचे वडील अमन हे यांना त्यांच्या नातवाची भेट घ्यायची होती, पण गेल्या काही दिवसांपासून ते शक्य होत नव्हतं. त्यामुळे आजोबा अमन यांना संशय आला.

जून महिन्यापासून ते नातवाला भेटण्याची मागणी करत होते, पण आरोपी अनिल दरवेळी काही ना काही कारण देऊन भेट टाळायचा. त्यामुळे अमन यांना संशय आला तेव्हा त्यांनी चौकशी केली असता, जी माहिती समोर आली ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.अनिल यांनी जवळच राहणाऱ्या आस्मा शेख यांच्यामार्फत मुलाला विकल्याचं समजलं. उत्तर प्रदेशातील एका दांपत्याला त्यांनी आपला दोन वर्षांचा मुलगा विकला. अवघ्या १.६ लाखांसाठी त्यांनी हा सौदा केला. मुलाचे आजोबा अमर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर, वडाळा ट्रक टर्मिनस (टीटी) पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः याप्रकरणी तक्रार दाखल केली. याप्रकरणी पित्यासह चौघांवर मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वडाळा टीटी पोलिसांनी दोघांना अटकही केली आहे.