विदेशी दारु महागल्याने तळीरामांना जबर फटका

दारुची करवाढ सरकारच्या अंगलट, विक्री निम्म्याने कमी, महसुलवाढीपेक्षा महसुलात मोठी घट

मुंबई – राज्याच्या तिजोरीत महसुलाचा ओघ वाढवण्यासाठी सरकारने विदेशी दारूवर केलेली करवाढ तळीरामांसाठी अडचणीची ठरली आहे. कारण विदेशी दारूच्या खपात कमालीची घट झाली आहे.

करवाढीमुळे विदेशी दारूच्या किमती प्रचंड वाढल्याने अनेक तळीरामांनी आपला मोर्चा स्वस्त आणि आकर्षक बनलेल्या ‘देशी’कडे वळवला आहे. परिणामी, राज्यभरातील बार आणि परमिट रूममधील विदेशी दारूची विक्री निम्म्याहून अधिक घटली आहे. शासनाला देशी-विदेशी दारूच्या विक्रीतून यापूर्वी वार्षिक ४३ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळत होता. मात्र आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे सरकारने विदेशी दारूवर १० टक्के व्हॅट, १५ टक्के परवाना शुल्क आणि ९ ते ७० टक्के जादा उत्पादन शुल्क लावण्याचा निर्णय घेतला. यामुळे किमान १४ हजार कोटी रुपयांची भर पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. पण विक्री कमी झाल्यामुळे महसुलाचे लक्ष्य गाठणे शासनासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. महत्वाचे म्हणजे बारमधील ग्राहकांची संख्या ५० ते ६० टक्क्यांनी कमी झाली.

सरकारने निर्णयामुळे नकळतपणे देशी दारूच्या उद्योगाला चालना मिळाली आहे. कारण विदेशी मद्यापेक्षा देशीवर तुलनेने कमी शुल्क वाढ करण्यात आली आहे.