
दिल्ली – केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी संविधानातील चर्चेदरम्यान राज्यसभेत केलेले एक वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राज्यसभेत झालेल्या चर्चेदरम्यान अमित शाह यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आज राज्यसभा आणि लोकसभेचेही कामकाज प्रचंड गदारोळामुळे उद्यापर्यंत तहकुब केले आहे.

संविधानाला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विशेष चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभागृहात बोलतांना अमित शाह म्हणाले की, आजकाल आबंडेकरांचे नाव सारखे घेणे ही फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर असा जप लोक करत असतात. एवढ्या वेळा जर देवाचे नाव घेतले तर एखाद्याला स्वर्गात जागा मिळेल. असे अमित शाह यांनी म्हटले. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. त्यानंतर आज सभागृहात विरोधकांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला आणि लोकसभा अध्यक्षांनी सभागृह उद्यापर्यंत तहकुब केले आहे. अमित शाहांनी बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर संसद भवन परिसरात विरोधकांनी आंदोलन केलं. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो हातात घेऊन आंदोलन केले आहे. अमित शाहांच्या या विधानाचा व्हिडीओ विरोधकांकडून व्हायरल केला जात आहे. दरम्यान अमित शाहांच्या टिप्पणीनंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही एक्सवर पोस्ट लिहिली. ज्यांना मनुस्मृतीवर विश्वास आहे. त्यांना आंबेडकरांची अडचण असते. असे म्हणत त्यांनी याचा निषेध व्यक्त केला आहे.

काँग्रेस पक्षाने माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. खरेतर काँग्रेस पक्ष हा डॉ. आंबेडकर विरोधी आहे. त्यांनी नेहमीच आरक्षण आणि संविधान विरोधी भूमिका घेतली आहे. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे, अशी टीका केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी केली आहे.
https://x.com/INCIndia/status/1869047318793605125?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1869047318793605125%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F









