तडीपार गुंडाला पोलिसांनी केली अटक ! ओळखू नये, म्हणून गुंडाने तोंडाला लावला मास्क

 पुणे – पुणे शहर व जिल्ह्यातून २ वर्षासाठी तडीपार केले असताना शहरात येऊन कोणी ओळखू नये म्हणून तोंडाला मास्क लावून बसलेल्या तडीपार गुंडाला वारजे पोलिसांनी अटक केली आहे.

अक्षय शांताराम सावंत (वय ३०) असे या गुंडाचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार प्रदिप विजय शेलार यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याददिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय सावंत याला पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी ११ ऑक्टोबर २०२३ रोजी पुणे शहर, पिंपरी चिंचवड आयुक्तालय तसेच पुणे व सातारा जिल्ह्यातून २ वर्षांकरीता तडीपार केले होते. या तडीपारीचा भंग करुन तो घरी आला होता.

सहायक पोलीस निरीक्षक मोहिते, पोलीस शिपाई पवार, भुरुक, दराडे, सुतकर यांच्याबरोबर फिर्यादी कर्वेनगर भागात पेट्रोलिंग करत असताना त्यांना बातमीदारांकडून बातमी मिळाली की, तडीपार गंड त्याच्या कर्वेनगर येथील घरी आला आहे. त्यानुसार पोलिसांनी कर्वेनगर येथे गेले. तेव्हा तो पार्किंगमध्ये तोंडाला मास्क लावून बसला होता. पोलिसांना पाहून तो पळून जाऊ लागला. तेव्हा त्याचा पाठलाग करुन पोलिसांनी पकडले. त्याच्याविरुद्ध वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.