प्रेयसीचं दुसऱ्या तरुणाशी प्रेमप्रकरण असल्याचा संशय ; नैराश्यात असलेल्या तरुणाने व्हिडिओ तयार करुन संपवले आयुष्य

पुण्यातील चाकण मधील २७ वर्षीय तरुणाने प्रेम प्रकरणातून लोणावळ्यातील राजमाची दरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सूर्यकांत रामदयाल प्रजापती असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, सूर्यकांत याचा चाकणमधील एका तरुणीबरोबर प्रेमप्रकरण सुरू होते. एकेदिवशी सूर्यकांतला त्याच्या प्रेयसीचं दुसऱ्या तरुणाशी प्रेमप्रकरण असल्याचा संशय आला होता. याच संशयामुळे नैराश्यात असलेला सूर्यकांत (दि.९ ऑक्टोबर) रोजी घर सोडून बाहेर निघून गेला. त्यानंतर बरेच दिवस तो घरी परत आलाच नाही. सुर्यकांत दुसऱ्या दिवशीही घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांनी चाकण पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरवात केली. पोलिसांनी तांत्रिक तपास केल्यानंतर सूर्यकांतचे शेवटचे लोकेशन हे लोणावळा असल्याचे पोलीसांना निदर्शनास आले. चाकण पोलीस आणि लोणावळा पोलीस घटनस्थळी गेले.

सूर्यकांत प्रजापतीने आत्महत्या करण्यापूर्वी दोन सेकंदाचा व्हिडिओ तयार करुन तो त्याच्या घरी ठेवलेल्या मोबाईलवर पाठवला. या तयार केलेल्या व्हिडिओद्वारे आणि त्याच्या लोकेशन वरून लोणावळा शिवदुर्गच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने मृतदेहाचा शोध घेऊन बुधवारी बाहेर काढला आहे. सूर्यकांतचा मृतदेह तब्बल ३७० फूट खोल दरीत आढळला आहे. दरम्यान, सूर्यकांतने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. शिवदुर्ग शोध पथकाचे अधिकारी सुनील गायकवाड यांच्या शोध पथकाने सूर्यकांतचा मृतदेह शोधला आहे. अवघ्या दोन सेकंदाच्या व्हिडिओवरून या आत्महत्येचा उलगडा झाला.