
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून धक्कादायक कारण समोर, लग्नाच्या तोंडावर आत्महत्या

पुणे – देहूत संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशजह.भ.प शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे देहू गावावर शोककळा पसरली आहे. आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

शिरीष महाराज यांनी आज सकाळी साडेआठच्या सुमारास राहत्या घरी उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज होते. तसंच, त्यांचे निगडी येथे इडली उपहारगृह देखील होते. त्यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे. नुकताच त्यांचा टिळा झाला होता. २० फेब्रुवारीला रोजी मोरे यांचा विवाह होणार होता. धक्कादायक म्हणजे शिरीष महाराज यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शिरीष महाराज यांनी लिहिलेला चिठ्ठीचा तपशील गोळा केला असून, प्राथमिक तपास सुरू आहे. त्यांच्या मोबाइलचा डेटा संपूर्णपणे फॉरमॅट करण्यात आला असल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा बनला आहे. प्राथमिकदृष्ट्या आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचं कळते, अशी माहिती देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिली. अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.
शिरीष महाराज मोरे हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे होते आणि ते प्रसिद्ध हिंदू धर्मप्रचारक संभाजी भिडे यांच्या विचारांचे अनुयायी होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे देहू आणि वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त केली जात आहे.









