
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘सेवा पंधरवडा’ व ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना’चा शुभारंभ

ठाणे – ग्रामीण विकास व पंचायत राज प्रणालीला बळकटी देणे, नागरिकांना शासनाच्या सेवा थेट उपलब्ध करून देणे, आरोग्य व पोषण जनजागृती वाढविणे तसेच स्वच्छता, लोकसहभाग यावर आधारित विविध राज्य व केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी अभियानांची ठाणे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा स्तरावरील अभियान शुभारंभ ग्रामपंचायत खोणी- वडवली बू, पंचायत समिती कल्याण येथे आज करण्यात आला.

या कार्यक्रमाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच याप्रसंगी ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमाचेही उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले व लाभार्थ्यांना विविध लाभ देण्यात आले. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशात विविध अभियानांचे शुभारंभ करण्यात आले आहेत. महिलांसाठी सशक्त नारी-सशक्त परिवार अभियान सुरू केले आहे. आपला देश विकासाच्या वाटेवर असून देशाचे नावलौकिक करण्यासाठी कामकाज सुरू आहे. याचाच भाग म्हणून 431 ग्रामपंचायतींमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भाग सक्षम असेल तर जिल्हा सक्षम होईल म्हणून अभियानाच्या माध्यमातून आज अभिमानाची सुरुवात करण्यात आली आहे. लोकाभिमुख, कल्याणकारी अभियान पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू करण्यात आले असून रस्ते, दिवे, पाणी, शाळा असून समृध्द गाव करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. खोणी समृद्ध गाव होण्याच्या मार्गावर आहे. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू राहील आणि महिलांना सक्षम करण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल. महिलांचे आरोग्य तपासणी या अभियानांतर्गत करण्यात येणार आहे. कॅन्सरग्रस्त महिलांची तपासणी करून लवकरात लवकर उपचार करण्यासाठी आज अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांचे लाभ घेऊन आणि अभियान राबवून समृद्ध गाव करण्यासाठी पुढाकार घ्या. ग्रामस्थांना रोजगार गावात उपलब्ध करून देण्यासाठी या अभियानांतर्गत विविध शासकीय योजनाचा व सेवेचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच 100 दिवस कृती कार्यक्रम स्पर्धेत जिल्हा परिषद, ठाणे राज्यात पहिला क्रमांक मिळाला याबद्दल अभिमान वाटतो. यापुढे देखील शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना तसेच महिलांना सोबत घेऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान उत्तम प्रकारे राबवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ठाणे महाराष्ट्रात प्रगत जिल्हा झाला पाहिजे, यासाठी सर्वांना सदिच्छा देऊन देश आत्मनिर्भर करण्यासाठी स्वदेशी वस्तूंचा वापर करावा, असा संदेश पंतप्रधान मोदी यांनी दिला आहे. यासाठी प्रथम गावाला समृद्ध करून 2047 सालाचे स्वप्न विकसित भारत करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले.









