
सरन्यायाधीश भूषण गवईंचे आश्वासन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून गवईंचे काैतुक

कोल्हापूर – राज्याच्या सीमेवरील दुर्गम भागातील सर्वसामान्य पक्षकारांना न्याय मिळण्यासाठी कोल्हापूर बेंचची निर्मिती होत आहे. ही न्याय व्यवस्था वकिलांसाठी नव्हे, तर गोरगरीबांसाठी उपलब्ध होत आहे. याठिकाणी शाहू महाराजांच्या विचारांप्रमाणे समानतेचे न्यायदान करा, असे आवाहन करतानाच सर्किट बेंच तयार झाले आहे. आता खंडपीठ उभारणीसाठी उच्च न्यायालयाने प्रस्ताव सादर करावा, ती मागणीही लवकरच पूर्ण होईल, असे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज केले.

कोल्हापूर सर्किट बेंचचे खंडपीठात रूपांतर लवकरच होईल, त्यादृष्टीने मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अलोक अराधे यांनी प्रयत्न करावेत, पायाभूत सुविधांसाठी मुख्यमंत्री तयार आहेत. सर्किट बेंचचे नियमित खंडपीठात रूपांतर होण्यासाठी जे काही लागणार आहे, त्याची पूर्तता उच्च न्यायालयाने लवकरात लवकर करावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. सरन्यायाधीश गवई यांनी सांगितले की, खंडपीठाच्या या 43 वर्षांच्या लढ्यामध्ये गेल्या 25 वर्षांपासून आपण स्वतः सहभागी आहोत. मुख्यमंत्री फडणवीस हे 2014 पासून या लढ्यात आहेत. त्यामुळे सर्किट बेंच झाल्यावरच कोल्हापूरमध्ये येईल, असे मी म्हणालो होतो. न्यायव्यवस्थेच्या विकेंद्रीकरणासाठी माझा नेहमीच आग्रह राहिला आहे. त्यामुळे अगदी कमी वेळेत हा निर्णय उच्च न्यायालय आणि राज्य शासनाच्या वतीने प्रत्यक्षात आला आहे. आज तो शब्द खरा होत असल्याचा आनंद होत आहे, असे त्यांनी सांगितले. पद हे अधिकार दाखवण्यासाठी नाही, तर समाजातील वंचितांच्या भल्यासाठी वापरण्याची आपल्या वडिलांची शिकवण होती. माझ्या नियुक्तीनंतर नियतीने ही संधी दिली आहे, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बेंचच्या निर्मितीसाठी गेल्या काही वर्षांत सातत्याने पाठपुरावा केला आहे. गेल्या महिनाभरात त्यांच्या मार्गदर्शनाखाली विधि व न्याय विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने विक्रमी वेळेत काम केले आहे. महाराष्ट्राने मनावर घेतल्यास कोणतेही काम अशक्य नाही, अशा शब्दात गवई यांनी देवेंद्र फडणवीस यांचे काैतुक केले.
मागील जवळपास ५० वर्षांच्या पाठपुराव्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच उद्यापासून सुरू होत आहे, हा ऐतिहासिक क्षण असून यामुळे कोल्हापूरसाठी विकासाचे दालन खुले झाले आहे. या निर्णयामध्ये खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य मला मिळाले आहे. खरेतर या बेंचचे शिल्पकार सरन्यायाधीश भूषण गवई हेच आहेत, असे फडणवीस म्हणाले.









