राज्य सरकारचा लाडक्या बहिणींना दणका, या बहिणींना वगळणार

लाडकी बहिण योजनेच्या अटी आणखी कडक, तब्बल २० लाख बहिणी होणार अपात्र, कोणता आहे नवीन नियम?

मुंबई – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. ज्या महिला इनकम टॅक्स भरत आहेत त्यांची नावे आता समोर येणार आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने महिलांच्या आयकरबाबत माहिती राज्य सरकारला देण्यास मान्यता दिली आहे.

लाडकी बहिण योजना सुरू झाल्यानंतर सरसकट सर्व महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला. याचा फायदाही महायुती सरकारला झाला. पण आता दर महिन्याला निधी देताना सरकारची दमछाक होत असून अनेक विभागाचे निधी लाडकी बहिण योजनेला वर्ग करावे लागत आहेत. त्यामुळे सरकारमधील अनेक विभागाचे कामकाज ठप्प झाले आहेत, तर अनेक विकासकामांना खीळ बसली आहे. त्यामुळे राज्य सरकार नवीन नियम आणि अटी शर्ती लादत बहिणींची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. आता करदात्या बहीण या योजनेतून वगळल्या जाणार आहेत. महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे करदात्या महिलांच्या यादीची मागणी केली होती, अखेर या मागणीस मंजुरी मिळाल्यानंतर कोणकोणत्या महिला एकीकडे आयकर भरतात आणि दुसरीकडे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेचा मूळ आढावा जानेवारी २०२५ मध्ये घेण्यात आला. या वर्षी रचनेचा आढावा सुरू झाला आणि धोरणाअंतर्गत ओव्हरलॅपिंग लाभ असलेल्या पात्र महिलांची ओळख पटवण्यात आली. आता अंदाजे २० लाख लाभार्थींना या योजनेतून वगळण्यात येणार आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी अटी ?
अर्जदाराचे वय २१ ते ६५ वर्षे दरम्यान असावे
कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे ट्रॅक्टर वगळता चारचाकी वाहन नसावे
कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य नसावा
सरकारी कर्मचारी (आउटसोर्स, स्वयंसेवी किंवा कंत्राटी कर्मचारी वगळता) नसावेत.