
साखरपुडाही झाला, लवकरच करणार लग्न, आक्रमक क्रिकेटर आणि युवा खासदारावर शुभेच्छा वर्षाव?

लखनऊ – भारतीय क्रिकेट संघातील एका स्टार खेळाडूच्या घरी लवकरच सनई चाैघडे वाजणार आहेत. कारण टीम इंडियाचा फलंदाज रिंकू सिंगने यूपीच्या खासदार प्रिया सरोजसोबत साखरपुडा केला आहे. दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. सध्या सोशल मिडियावर याची चर्चा आहे.


डावखुरा फलंदाज रिंकू सिंग गेल्या दोन वर्षांपासून टीम इंडियासाठी चांगली कामगिरी करत आहे. रिंकू सिंग भारतीय संघातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. टी-२० फॉरमॅटमध्ये त्याची कामगिरी अप्रतिम राहिली आहे. रिंकू सिंगने टीम इंडियासाठी ३० टी२० सामन्यांमध्ये ४६ पेक्षा जास्त सरासरीने ५०७ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेटही १६० पेक्षा जास्त आहे. रिंकूने टीम इंडियासाठी २ वनडे सामनेही खेळले आहेत. रिंकू सिंग हा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा महत्त्वाचा खेळाडू आहे. तर प्रिया सरोज या समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत. प्रिया सरोज या सर्वोच्च न्यायालयात वकील आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. प्रिया सरोजचे वडील तुफानी सरोज हे देखील मच्छिलिशहर लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदार राहिले आहेत. यानंतर त्यांची मुलगी प्रिया सरोज हिने मच्छली शहरचे प्रतिनिधित्व केले आणि देशातील दुसऱ्या सर्वात तरुण खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. प्रिया यांनी २०२४ मध्ये, भाजपच्या बीपी सरोज यांचा ३५,८५० मतांच्या फरकाने पराभव करून पहिली लोकसभा निवडणूक जिंकली होती. दरम्यान टीम इंडियाला २२ जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिका खेळायची आहे, ज्यामध्ये ५ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. आधी टी-२० मालिका होणार आहे, ज्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून त्यात रिंकू सिंगच्या नावाचाही समावेश आहे.

साखरपुडा झाल्याच्या गोष्टीवर रिंकु सिंग वा प्रिया सरोज यांनी अद्याप अधिकृतपणे माहिती दिलेली नाही. मात्र, या जोडीतून एक नवीन राजकीय आणि क्रीडाप्रेमी जोडगोळी उभी राहिल्याचे म्हटले जात आहे. पण प्रिया यांचे वडील तुफानी सरोज यांनी दोघांच्या विवाहाची अजून चर्चा सुरू असल्याचे म्हटले आहे.









