पिंपरी – जावई आपल्या साथीदारांच्या मदतीने दुचाकीवरून महिलांची मंगळसूत्र हिसकावयाचा. तर त्यांची सासू चोरलेल्या सोन्याची विक्री करीत असे. या दोघांच्याही पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने मुसक्या आवळल्या.सादीक शमल खान इराणी आणि नर्गीस जाफर इराणी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच आरोपी सादीक यांच्या आणखी एका साथीदाराचा शाेध पोलीस घेत आहेत.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरामध्ये महिलांच्या गळयातील सोन्याचे दागीने हिसडा मारुन चोरल्याचे काही गुन्हे घडले होते. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक घेत होते. या गुन्ह्यांमध्ये रेकॉर्डवरील सराईत इराणी गुन्हेगारांचा सहभाग असल्याचे दिसून आले. उपनिरीक्षक शिवानंद स्वामी यांना माहिती मिळाली कि, चैनचोरीचे गुन्हे करणारे इराणी गुन्हेगार निगडी परिसरामध्ये मोटर सायकलवरुन संशयितरित्या फिरत आहेत.
त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला. ट्रान्सपोर्टनगर परिसरात दुचाकीवरून आलेल्या सादीक याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सादीक हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर १९ गुन्हे दाखल आहेत. सादीक याने आपल्या साथीदाराच्या मदतीने वेगवेगळ्या चोरीच्या वाहनांचा वापर करुन सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. सादीक याच्याकडून १२ तोळे वजनाचे नऊ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. सादीक याच्याकडून निगडी पोलीस ठाण्यातील तीन, चिंचवड, चिखली, एमआयडीसी भोसरी, चाकण आणि स्वारगेट पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आला आहे.जावयाने केलेल्या चोरीचा माल आरोपी सासू नर्गिस ही करीत असल्याचे तपासात उघड झाले. त्यामुळे तिलाही पोलिसांनी अटक केली आहे.