घरात इस्त्री करत असताना लाईट गेली. त्यानंतर मुलाला शाळेत सोडण्याची वेळ झाल्याने महिला इस्त्रीचे बटन सुरु ठेऊन घर बंद करून शाळेत गेली. मुलाला शाळेत येऊन बघते तर घरात भीषण आग लागल्याचे दिसले. ही घटना बुधवारी (दि. २५) सकाळी दहा वाजता भोंडवे बाग, रावेत येथे घडली.
याबाबत माहिती अशी की, पिंपरी-चिंचवड अग्निशामक विभागाच्या प्राधिकरण उपकेंद्राला सकाळी दहा वाजता माहिती मिळाली की, भोंडवे बाग, रावेत येथे एका सदनिकेत आग लागली आहे. त्यानुसार अग्निशामक अधिकारी गौतम इंगवले, प्रमुख अग्निशामक विमोचक संपत गौंड, संजय महाडिक, फायरमन अनिल माने, वाहन चालक राजेश साखळे, ट्रेनि फायरमन गौरव सुरवसे, शिवाजी पवार, राकेश महामुलकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी पाहणी केली असता आगीत बेडरूम मधील सर्व वस्तू जळाल्या होत्या. माहिती घेतल्यानंतर आगीचे कारण समोर आले. घरातील महिला कपड्यांना इस्त्री करत होती. अचानक लाईट गेली. दरम्यान मुलाच्या शाळेची वेळ झाल्याने महिला घाईघाईत इस्त्रीचे बटन बंद करायचे विसरून गेली.
महिला मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेली. दरम्यान, लाईट आली. इस्त्री गरम होऊन आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच महिलेने मोबाईल फोन देखील बेडरूममध्ये चार्जिंगला लावला होता. आगीमध्ये बेड, गादी, उशी, ब्लॅंकेट, इस्त्री, मोबाईल फोन, इलेक्ट्रिक वायर, बोर्ड, सिलिंग फॅन या वस्तू जळून गेल्या