
फास्टॅगसाठी उद्यापासून नवीन नियमांची अंमलबजावणी, नवा नियम काय?

दिल्ली – केंद्र सरकारने प्रत्येक वाहनांना फास्टॅग सक्तीचे केले आहे. पण १७ फेब्रुवारीपासून फास्टॅग साठी नवीन नियम लागू होणार आहेत. याबाबत नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने नवीन फास्टॅग बॅलन्स व्हॅलिडेशन नियम जाहीर केले आहेत, जे १७ फेब्रुवारी २०२५ पासून लागू होणार आहे. त्यामुळे फास्टॅग असूनही तुम्हाला दंड होऊ शकतो.

नव्या नियमांनुसारफास्टॅग व्हाइटलिस्टेड (सक्रिय), ब्लॅकलिस्टेड (निष्क्रिय) असेल. अशात जर फास्टॅगमध्ये अपुरा बॅलेन्स, KYC झाली नसेल किंवा वाहन नोंदणी तपशीलांमध्ये तफावत आढळली तर तो ब्लॅकलिस्टेड केला जाईल.नवीन नियमांनुसार, जर तुमचे वाहन टोल बूथवर पोहोचण्यापूर्वी फास्टॅग ६० मिनिटांपेक्षा जास्त काळ ब्लॅकलिस्ट केला गेला असेल तर तो शेवटच्या क्षणी रिचार्ज करता येणार नाही. पण, टॅग स्कॅन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर१० मिनिटांच्या आत टॅग रिचार्ज केल्यास युजरला टोल शुल्क भरता येणार आहे. अशा परिस्थितीत दंड टाळता येणार आहे. एनपीसीआयच्या २८ जानेवारी रोजीच्या परिपत्रकानुसार, टोल प्लाझावर टॅग स्कॅन झाल्यानंतरच्या विशिष्ट वेळेत आता फास्टॅग व्यवहार वैध केले जातील. यासाठी दोन अटी लागू करण्यात आल्या आहेत. यामध्ये टॅग स्कॅन करण्यापूर्वी ६० मिनिटे आणि टॅग स्कॅन केल्यानंतर १० मिनिटे अशा दोन अटींचा समावेश आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्व टोलनाक्यांवर पथकर येत्या १ एप्रिलपासून ई टॅग किंवा फास्टॅगद्वारे भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. स्मार्ट कार्ड, क्यूआर कोड, रोख किंवा अन्य पद्धतीने पथकर भरायचा असेल तर खिशाला भुर्दंड बसणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने टोल नाक्यांसाठी फास्टॅग प्रणाली लागू केली आहे. रोख पैशांत टोल घेण्याऐवजी एकाच डिजीटल पद्धतीने टोल जमा होईल अशी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यामुळे टोलमधील व्यवहारांत पारदर्शकता राहणार आहे. तसेच टोलनाक्यांवर वाहनांच्या रांगा लागण्याचे प्रमाणही कमी होणार आहे.









