तर ‘या’ लाडक्या बहिणीला मिळणार नाहीत दीड हजार रुपये

मुंबई – राज्यात विधानसभा निवडणुकीत विक्रमी विजयानंतर महाआघाडीचे सरकार स्थापन झाले असून लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील बहिणी घेत आहे. या निवडणुकीच्या विजयात मोठा वाटा लाडकी बहिणींचा आहे.आता भाजपच्या नेतृत्वाखाली सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांची चौकशी करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये लाडकी बहिण योजनेसंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता केशरी आणि पिवळे रेशन कार्ड वगळता इतर सर्वच अर्जांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेकांची नावे या योजनेच्या लिस्टमधून कमी होतील. त्यासंदर्भात एक नियमावली बनवण्यात आली आहे. यानुसार लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. लाभार्थी महिलांकडे चारचाकी नसावी. महिलांनी दोन अर्ज केले असल्यास त्यांचा अर्ज अपात्र होणार. आधार कार्डात आणि बँकेत नाव वेगळे असल्यास लाभार्थी महिला अपात्र ठरवले जाणार. आंतरराज्य महिला यासाठी अपात्र असणार आहेत. दरम्यान तक्रारी शिवाय आम्ही कोणत्याही अर्जाची चौकशी करणार नसल्याचे देखील आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. ज्या महिलांनी या योजनेचे विहित निकष पाळले नाही त्यांची तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

लाडकी बहिण योजनेबाबत वर्धा, पालघर, लातूर, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यातून अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे योजनेसाठी जमा करण्यात आलेल्या अर्जांची पुन्हा पडताळणी करण्यात येणार आहे. या पडताळणीमध्ये अर्जामध्ये कोणतीही चुकीची माहिती आढळली तर ते अर्ज फेटाळले जाणार आहेत.