म्हणून ‘या’ अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई – बीडच्या मस्साजोगमधली सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन अनेक आरोप -प्रत्यारोप होत आहेत. भाजप आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीविषयी केलेल्या वक्तव्याची खूप चर्चा सुरु आहे. पण आता प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आपल्या तक्रारींचं निवेदन दिलं आहे. त्यामुळे आता कारवाई कडे लक्ष असणार आहे.

भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळी , रश्मिका आणि सपना चौधरी यांच्या नावांचा उल्लेख केला होता. त्यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका सर्वांसमोर मांडताना राजकारणासाठी महिला कलाकारांच्या नावाचा गैरवापर करु नका, असे सांगितले होते. दरम्यान या प्रकरणी आता प्राजक्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. तिने मुख्यमंत्र्यांना आपल्या तक्रारींचं निवेदन दिले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून एक पोस्ट करत याबद्दल माहिती देण्यात आली आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली आणि निवेदन दिले. त्यांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आश्वस्त केलं. त्यांच्याविरोधात यूट्यूबवर काही लोक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करतात, अशीही तक्रार त्यांनी यावेळी केली. त्या सर्वांवर सुद्धा कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिले. राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्राजक्ता माळीच्या तक्रार अर्जाची दखल घेत, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून केलेल्या कार्यवाहीचा वस्तुस्थिती दर्शक केलेला अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान राज्य महिला आयोगाने धस यांच्या वक्तव्याची आणि काही व्हिडिओ या सगळ्यांची दखल घ्यावी आणि त्यावर कारवाई करावी, असा तक्रार करणारा अर्ज प्राजक्ता माळी हिने राज्य महिला आयोगाला दिला होता.

 

मी ग्रामीण भागातला आहे,त्यामुळे मी केलेल्या वक्तव्याचा प्रसारमाध्यमांनी विपर्यास केला.माझ्या बोलण्याने कोणाची भावना दुखावली गेली असेल तर याबाबत मला चंद्रकांत पाटील यांचा फोन आला.त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सुरेख धस यांनी सांगितले आहे.