बुलढाणा जिल्ह्यातील चिखली परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. चिखलीत एका सर्पमित्राने आपल्याच मित्राच्या हाती विषारी साप देत वाढदिवसालाच त्याचा बळी घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांवर चिखली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिखलीमधील गजानन नगर येथे राहणारा संतोष जगदाळेचा वाढदिवस ५ जुलैला होता. वाढदिवसानिमित्ताने कुटुंब, नातेवाईकांनी त्याचे पारंपरिक पद्धतीने औक्षण केले. त्यानंतर केक कापत त्याचा वाढदिवसही साजरा कण्यात आला. यानंतर गजानन नगर येथील त्याचे दोन मित्र वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. त्यावेळी संतोषचा वाढदिवस साजरा करायचा म्हणून या कथित मित्रांनी संतोषला बाहेर आणले.
संतोष जगदाळे याचा वाढदिवस साजरा करत असताना त्याच्या एका मित्राने फोटो काढण्याच्या बहाण्याने संतोषच्या हातात विषारी साप देण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या विषारी सापाने संतोषच्या हाताला दंश केला. यानंतर त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र सापाचे विष अंगात भिनल्याने संतोष जगदाळेचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे आनंद साजरा करणाऱ्या जगदाळे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला.
याप्रकरणी संतोषच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन, सर्पमित्र आरिफ खान रहीस खान आणि धीरज पंडितकर या दोघांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरिफ खान हा सर्पमित्र असून तो नेहमी विविध प्रकारचे साप सोबत बाळगतो, असे बोललं जाते. या प्रकरणानंतर आरिफ खान आणि धीरज पंडितकर हे दोघेही फरार झाले झाले आहे. सध्या पोलिसांकडून या दोघांचाही तपास सुरु आहे.