साहेब…काळया काचांवर कारवाई कधी ? वाहतूक पोलीसांचे दुर्लक्ष, वाहतुक पोलीस कशात दंग ? बघा सविस्तर बातमी

हवेली प्रतिनिधी – सचिन सुंबे | पूर्व हवेलीतील अनेक गाड्यांना चार चाकी गाड्यांना काळया काचा लावलेल्या दिसत असून वाहतूक पोलीस याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करत असून काळया काचांवर कारवाई कधी असे नागरिक विचारू लागले आहेत. चारचाकी गाडीच्या काळ्या काचा ठेवणे हे अनेक लोकांना शानशौकीन म्हणून आवडते. म्हणूनच चारचाकी गाडीच्या काचांवर काळी फिल्म लावली की आपली गाडी उठून दिसते असे मत अनेक गाडी घेतलेल्या नागरिकांचे झाले आहे . पण या काळया काचेच्या नावाखाली अनेक गैरधंदे चालू असुन दारु वाहतूक ,गुटखा वाहतूक व इतर धंदे सरास चालू आहेत .त्याकडे वाहतूक पोलीसांचे दुर्लक्ष झाले आहे .

पुणे सोलापूर महामार्गावर हडपसर पासुन उरुळी कांचन पर्यंत अनेक “ऊंचे लोग ऊंची पसंती” या जाहिराती प्रमाणे अनेकांनी मोठ्या किमंतीच्या चारचाकी गाड्या घेतल्या असुन त्यावर काळी फिल्म लावली आहे . पण असे करणे बेकायदेशीर आहे. वाहतूक नियमांनुसार कारच्या काचेवर काळी फिल्म लावल्यास दंड आकारण्यात येतो .कारण हे वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याच्या कक्षेत असुन वाहतूक पोलीस मात्र या मोठ मोठ्या किमंतीच्या गाडया बघून दुर्लक्ष करत असुन पोलिसांचा वचक कमी पडत आहे. त्यामुळे काळया काचेवाले पोलिसांना बायबाय करून त्यांच्या समोरून जात आहे. पण पोलीस मात्र त्या गाडीकडे नुसते बघत असताना दिसत आहे.

पुणे शहराच्या जवळील भागांचे झपाट्याने नागरिकीकरण झाले, त्यातच शेतीचे रुपांतर गुंठेवारी मध्ये होऊन हातात पैसा येऊ लागला. त्यामुळे चारचाकी गाडयांच्या प्रमाणात वाढ होऊन त्यावर काळया काचा आल्या खऱ्या पण या काळया काचेखाली वेगळेच धंदे सुरू झाले. पोलीसांचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे . भाजीपाल्याच्या टेंम्पोमध्ये भाजी घेऊन चाललेल्या शेतकऱ्यांशी हुज्जत घालताना पोलीस दिसत आहे. त्याच वेळेस चारचाकी काळया काचेवाले पोलिसांना ओळख देऊन जात आहे .मात्र पोलीस काहीच कारवाई करत नसल्याचे दिसून येत आहे. वाहतुकीचे नियम सगळ्यांना सारखेच असताना पोलीसांचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले असुन मोठ्यांना सुट व गरीबांची लुट अशी अवस्था झाली आहे .

कारच्या काळ्या  काचा ठेवायच्या असतील, तर नियमानुसार, कारच्या बाजूच्या खिडक्यांवर ५० टक्के विजिबिलीटीसह ब्लॅक फिल्म, तसेच पुढील आणि मागील काचेवर ७०टक्के विजिबिलीटी असलेली काळी फिल्म लावू शकतो असा नियम आहे परंतु पुणे सोलापूर महामार्गावर संपूर्ण गडद काळी फिल्म लावलेल्या गाड्या दिसत असुन नंबर प्लेट नसलेल्या गाड्या सुद्धा महामार्गावरुन काळया काचा लावून फिरत असल्याचे दिसून येत आहे . त्यामुळे पोलिसांनी यावर वेळीच कारवाई करावी अशी चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे.

वाहतूक पोलीस कारवाई करताना टेम्पो सारख्या वाहनांवर कारवाई करतात आणि जे कायद्यात बसत नाही त्या शान शौकीन काळया काचांच्या गाड्यांवर कारवाई करण्याचे टाळतात. यावरून कष्टकरी जनतेची लुट तर काळ्या काचा घेऊन फिरणाऱ्या चारचाकी वाल्यांना सुट अशी अवस्था वाहतूक पोलिसांची आहे . आता लोणी काळभोर वाहतूक पोलीस काय कारवाई करतात पाहावे लागणार आहे