
घरकाम करणाऱ्या महिलेने कपाटातील हिऱ्यांचे कानातील दागिने आणि चांदीची भांडी असा एकूण 20 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. मांजरी बुद्रुक (ता. हवेली) येथील मांजरी ग्रीन (फेज 3) या उच्चभ्रू वस्तीतील एका रो-हाऊसमध्ये ही घटना घडली आहे.

याप्रकरणी घरमालक कामना कौशल यांनी मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मांजरी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून मध्यप्रदेशातील एका महिलेवर संशय व्यक्त करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कामना कौशल या विमाननगर येथील एका कंपनीत नोकरी करतात. त्यांच्या घरी डिसेंबर 2025 पासून छोटी बाई कर्राम (रा. मध्यप्रदेश) ही महिला घरकामासाठी आली होती. ती बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावरील सर्व्हंट रूममध्ये राहत होती. मात्र 19 फेब्रुवारी 2026 पासून ती कोणालाही काहीही न सांगता अचानक घर सोडून निघून गेली. गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास रामनवमी आणि कन्या पूजनाची तयारी करत असताना फिर्यादी यांनी कपाटातील पूजेची चांदीची भांडी शोधली. मात्र कपाटात भांडी आढळली नाहीत. अधिक तपासणी केली असता अडीच लाख रुपयांच्या चांदीच्या भांड्यांसोबतच 18 लाख रुपये किमतीचे हिऱ्यांचे कानातील स्टडदेखील गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरातील सदस्यांकडे चौकशी करून आणि सर्वत्र शोध घेऊनही दागिने व भांडी न मिळाल्याने चोरी झाल्याची खात्री झाली. एकूण 20 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी झाल्याचे आढळून आले.दरम्यान, कामना कौशल यांनी या चोरीबाबत घरकाम करणाऱ्या छोटी बाई कर्राम हिच्यावर संशय व्यक्त केला आहे. डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीत ही चोरी झाल्याचा अंदाज असून मांजरी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.











