तळेगाव दाभाडे शहरात गोळीबार ; पोलिसांनी काढली आरोपींची धिंड

तळेगाव दाभाडे शहरात अंदाधुंद गोळीबार करत दहशत निर्माण करणाऱ्या तिघांसह सहा जणांच्या टोळक्याची तळेगाव पोलिसांनी तळेगाव परिसरातून धिंड काढली.रोहन उर्फ चिक्या उत्तम शिंदे ,नीरज उर्फ दाद्या बाबू पवार ,आदित्य नितीन भोईनल्लू , विकी खराडे आणि अन्य दोघांना अटक केली.आरोपींना प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी वडगाव न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कस्टडीची रिमांड देण्यात आली असून अटक आरोपींकडून तपासात तीन गावठी पिस्तुले व ८ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

चिक्या शिंदे याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून ‘आम्ही इथले भाई आहोत आमच्या नादाला कोणी लागायचे नाही’ असे मोठमोठ्याने बोलून शिवीगाळ करत तळेगाव शहरातील गजानन चौक, शाळा चौक, राजेंद्र चौक, मारुती मंदिर चौक अशा ठिकाणी गोळीबार केला. आरोपींनी शहरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गोळीबार केल्याचे तपासात निष्पन्न झाले. गोळीबार केल्यानंतर आरोपी पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. गोळीबाराचा थरार रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास करत पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने मुख्य संशयित रोहन शिंदे, नीरज पवार, आदित्य भोईनल्लू यांना नाशिक येथून ताब्यात घेतले. आरोपींना पुढील कारवाईसाठी तळेगाव दाभाडे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तर इतर तिघांना तळेगाव पोलिसांनी अटक केली.पोलीस कोठडीत असताना संशयितांकडे तपास करत पोलिसांनी तीन गावठी पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुसे जप्त केली. त्यानंतर सोमवारी सायंकाळी सर्व आरोपींची तळेगाव दाभाडे शहरात धिंड काढली. ज्या परिसरात आरोपींनी गोळीबार करुन दहशत निर्माण केली होती, त्याच परिसरात आरोपींची धिंड काढण्यात आली.