चंद्रपुरात मनसे पदाधिकाऱ्यावर गोळीबार, गुन्ह्याचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद

चंद्रपुरात भर दिवसा गोळीबाराची घटना घडली आहे. चंद्रपूर शहरातील गजबजलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आहे.

या गोळीबारात अमन अंधेवार नामक युवक जखमी झालाय. अमन हा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा जिल्हाप्रमुख असल्याची माहिती समोर येत आहे. याच संकुलात त्याचे कार्यालय आहे. जुन्या वैमनस्यातून त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

वर्षभरापूर्वी याच ठिकाणी त्याच आरोपीने अमनच्या लहान भावावर गोळीबार करून पळ काढला होता. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले रघुवंशी कॉम्प्लेक्स हे व्यावसायिक संकुल आहे. हा परिसर प्रचंड गर्दीचं आणि गजबजलेलं असतं. त्यामुळे इथे गोळीबार झाल्याने पोलीसही चक्रावले आहेत. घटनेची लागलीच दखल घेत पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

 

गोळीबाराची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मनसे पदाधिकारी अमन अंधेवार फोनवर बोलत होते. यावेळी तिथे एक व्यक्ती येतो. त्याच्या पाठिवर बॅग असते. तो अंधेवार यांच्या पाठीमागून येतो. यानंतर तो बॅगेतून बंदूक काढतो आणि अमन यांच्यावर गोळीबार करतो. यावेळी अमन यांना गोळ्या लागतात. पण तरीही ते जीव वाचवण्यासाठी पळतात. दुसरीकडे आरोपीदेखील गोळीबार करुन तिथून धूम ठोकतो.