धक्कादायक! ‘तुमची मुलगी सेक्स रॅकेटमध्ये अडकली आहे’, अश्या फ्रॉड कॉलने शिक्षिकेने गमावला आपला जीव

ग्रा येथे एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सायबर फसवणुकीचा बळी ठरलेल्या शिक्षिकेला असा धक्का बसला की त्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. ३० सप्टेंबर रोजी ही घटना घडली. ५८ वर्षीय मालती वर्मा यांना मोबाईलवर बनावट व्हॉट्सॲप कॉल आला.

शिक्षिका मालती वर्मा या गर्ल्स ज्युनियर हायस्कूल, अछनेरा येथे तैनात होत्या. त्यांना एक व्हॉट्सॲप कॉल आला होता, ज्यामध्ये फोन करणाऱ्याने आपली ओळख पोलीस अधिकारी म्हणून दिली होती. फोन करणाऱ्याने सांगितलं की, तुमची मुलगी एका सेक्स रॅकेटमध्ये अडकली आहे, तिला सोडवण्यासाठी त्वरित एक लाख रुपये पाठवावे लागतील. कॉल दरम्यान, फसवणूक करणाऱ्याने मालतीला घाबरवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याच्या वेशात असलेल्या डीपीचा वापर केला. त्यांनी मालतीला तत्काळ पैसे न पाठवल्यास तिच्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल करून तिला तुरुंगात पाठवू, अशी धमकी दिली. हे ऐकून मालती घाबरल्या आणि त्यांनी आपल्या मुलाला फोन करून लगेच पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. याप्रकरणी दिव्यांशुने त्याच्या आईला कॉलरचा नंबर मागितला. नंबर पाहिल्यानंतर तो फेक कॉल असल्याचं त्याने लगेच ओळखलं. हा क्रमांक पाकिस्तानी कोडने सुरू होत होता.

शिक्षिका मालती वर्मा यांना चार तास डिजिटल अरेस्टमध्ये ठेवलं. याच दरम्यान, त्याला ८ कॉल आले. शिक्षिकेचा मुलगा दिव्यांशु याला ही बाब कळताच त्याने आपल्या आईला हे खोटं असल्याचं पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांची मुलगी पूर्णपणे सुरक्षित आहे. दिव्यांशुनेही त्याची बहीण वंशिकाशी संपर्क साधला आणि व्हिडिओ कॉलद्वारे आपण कॉलेजमध्ये सुरक्षित असल्याचं दाखवलं. यानंतरही मालती वर्मा या त्या फेक कॉलमुळे बसलेल्या मानसिक धक्क्यातून सावरल्या नाहीत.डिजिटल अरेस्टनंतर मालती वर्मा भीती आणि मानसिक तणावातून बाहेर येऊ शकल्या नाहीत. शाळेतून घरी परतल्यानंतर त्यांची प्रकृती ढासळू लागली. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेलं, मात्र चार तासांनंतर त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचा मृत्यू झाला.मालती वर्मा यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत असून लवकरच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.