रिक्षाने घरी जात असताना वाटेत तिघांनी आडवून विजय कांबळे याच्याविरुद्ध तक्रारी करुन पाठपुरावा करतोस ते थांबव, नाही तर तुझे काही खरे नाही, असे म्हणून रिक्षाचालकाला लाथाबुक्क्यांनी व दांडक्याने बेदम मारहाण करुन जबर जखमी केले.
याबाबत तुकाराम अर्जुन लांडगे (वय ४६) यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन अॅक्टीवावरील तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बुधवारी सायंकाळी सहा वाजता थेऊर रेल्वे पुलानंतर काकडे मळा कडे जाणार्या रोडवर घडला.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षाचालक आहेत. ते रिक्षा घेऊन काकडे मळा येथील घरी जात होते. थेऊर येथील रेल्वे पुल ओलांडल्यावर काकडे मळाकडे जाणार्या रस्त्यावर त्यांनी युटर्न घेतल्यानंतर दोन अॅक्टीवावरुन तिघे जण आले. त्यांनी रिक्षासमोर आपल्या गाड्या थांबविल्या. त्यामुळे लांडगे यांना रिक्षा थांबवावी लागली. त्यांनी लांडगे यांना रिक्षामधून बाहेर ओढले.
दोघांनी त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या दोन्ही पायाच्या नडगीवर, पोटरीवर मारुन जखमी केले. त्यांच्यातील एक जण म्हणाला, विजय जानबा कांबळे याच्याविरुद्ध तक्रारी करुन पाठपुरावा करतोस, ते थांबव़ नाही तर तुझे काही खरे नाही, असे म्हणून फिर्यादीला पुन्हा लाथाबुक्क्यांने व दांडक्याने मारहाण केली. फिर्यादी यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्यातील एकाने मिरची पावडरचा स्प्रे त्यांच्या डोळयावर मारला. त्यामुळे त्यांना कमी दिसु लागले. त्यानंतर त्यांनी पुन्हा शिवीगाळ करुन फिर्यादीच्या दोन्ही पायाच्या नडगीवर पोटरीवर मारुन जखमी करुन पळून गेले. पोलीस हवालदार व्ही एन जाधव तपास करीत आहेत.