धक्कादायक ! मुंबईत नेमकं चाललंय तरी काय ? २० जणांची टोळी कोणाच्या तरी शोधात

मुंबई शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे, त्यामुळे नागरीक जीव मुठीत धरून जगताना दिसतात. उल्हासनगरमध्येही नागरिकांची चिंता वाढवणारी एक घटना उघडकीस आली आहे.

गेल्या आठवड्यात उल्हानगरमध्ये काही तरूणांची टोळी फिरत असल्याचे आणि कोणाचा तरी शोध घेत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या संतोषनगरमध्ये काही दिवसांपुर्वी रात्रीच्या सुमारास २० जणांची टोळी कोणाच्या तरी शोधात फिरत होती, ही टोळी संतोषनगर मधील एका तरुणाची हत्या करण्यासाठी आली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ९ तारखेला रात्री साडेनऊच्या सुमारास उल्हासनगर कँप नंबर ४ संतोषनगर येथे काही तरुणांचं टोळक सीसीटीव्हीमध्ये दिसलं होतं. काहींचा चेहरा रुमालाने बांधून झाकून घेतलेला तर काहींच्या डोक्यावर हुडी अशा अवतारात २० तरूण एकामागोमाग एक एका ठिकाणी जमा झाले. काहींच्या हाताच तलवार, चाकू, दांडकी तर काहींच्या हातात चॉपर होते. बराच वेळ कोणाच्या तरी शोधात असल्यासारखे फिरत होते आणि त्यानंतर एकामागोमाग चालत निघून गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. एका तरुणाची हत्या करण्यासाठी ते फिरत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

आता या प्रकरणी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे हे आक्रमक झाले असून त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांचा चांगलाच समाचार घेतला. या शहरात असे प्रकार वारंवार होतात. पोलिस यंत्रणा शहरात आहे का, त्यांचा काही वचक आहे की नाही, असा प्रश्न पडलाय अशी टीका बोंडारे यांनी केली आहे. दरम्यान त्यांनी शहरात फिरणाऱ्या या अज्ञात तरुणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्या तरूणांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. तसेच नागरिकांना कायदा हातात घ्यायला लावू नका असे आवाहन देखील बोडारे यांनी पोलीस प्रशासनाला केले आहे.