पुणे जिल्ह्यातील डोणजे गावचे माजी उपसरपंच आणि कंत्राटदार विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे.
कोल्हेवाडी, खडकवासला येथे भरदिवसा एका तरुणाची कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आली आहे. सतीश थोपटे असे मृताचे नाव आहे. हल्लेखोर पसार झाले असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, काल सायंकाळी चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी येथील सतीश थोपटे राहत असलेल्या वसाहतीच्या परिसरात अज्ञात चार हल्लेखोरांनी हातात कोयते घेऊन पाठलाग करत त्यांच्यावर सपासप वार केले. यानंतर गंभीर जखमी झालेल्या सतीश थोपटे यांना जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कोल्हेवाडी या गजबजलेल्या परिसरात भर दिवसा ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ला कोणी व का केला? याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून हल्ल्याची संपूर्ण घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. दरम्यान, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस नेमक्या काय उपाययोजना राबवणार? याकडे आता सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.