धक्कादायक ! जळगावमध्ये प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसला भीषण आग; सर्व प्रवासी सुखरूप, काय घडले नेमके?

जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये बसस्थानकात पोहोचण्यापूर्वीच प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसला अचानक आग लागली. यानंतर बसचालकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना बसच्या खाली उतरवले.त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

यावल शहारातील बसस्थानकाजवळ असलेल्या पंचायत समितीसमोर एसटी बसनं अचानक पेट घेतला. ही बस विदगाव मार्गे यावला आली होती. आग लागल्याचं लक्षात येताच चालकानं प्रसंगावधान राखत बस थांबवली. बस थांबताच सर्व प्रवासी सुखरूप खाली उतरले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

ही घटना इतर ठिकाणी घडली असती तर मोठी जीवितहानी झाली असती. याबाबत यावलचे आगार प्रमुख दिलीप महाजन यांना विचारले असता, वाहनाचे इंजिन गरम झाल्याने हा प्रकार झाला असावा असे त्यांनी सांगितले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.